Advertisement

संपादकीय अग्रलेख- उतावीळ मीडिया , अतिउतावीळ नेते

प्रजापत्र | Wednesday, 05/08/2026
बातमी शेअर करा

कोणत्याही नेत्याच्या भाषणातील,वक्तव्यातील मागच्या पुढच्या संदर्भांचा विचार न करता आपल्या मनातील बातमी नेत्याच्या नावाने चालवायची स्पर्धाच जणू मागच्या काही काळात मीडियात सुरु आहे. मीडियाच्या वेगवेगळ्या प्लँटफॉर्ममधील काहींनी कसलाही विचार न करता मोडूनतोडून बातम्या देण्याचा उतावीळपणा करायचा आणि स्वतःला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांचे नेते म्हणवणारानी संबंधित नेत्याने खरोखर तसे वक्तव्य केले आहे का नाही याची खातरजमा न करताच 'उचलली जीभ' पद्धतीने काहीही वक्तव्य करायचे असला अतिउतावीळपणा याची जणू स्पर्धाच माध्यमातील काही घटक आणि काही नेत्यांमध्ये लागली असावी असे चित्र सध्या राज्यात आणि त्यातही बीड जिल्ह्याच्या संदर्भाने पाहायला मिळत आहे . हा मीडियाचा उतावीळपणा आणि नेत्यांचा अतिउतावीळपणा एकूणच लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.

मागच्या दोन तीन वर्षात बीड जिल्ह्यातील सामाजिक दरी मोठ्याप्रमाणावर वाढली असून एकूणच सामाजिक वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या जाती किंवा धर्मावरून एखाद्या संपूर्ण जातीला  किंवा धर्माला बदनाम करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. स्वतःला राजकीय, सामाजिक कार्यकर्ते म्हणविनारांकडून हे होत असताना ते त्यांचे राजकारण आहे असे म्हणता येईल, मात्र या साऱ्या प्रकाराला स्वतःला माध्यमे म्हणविणाऱ्या व्यवस्थेने देखील हातभार लावला किंबहुना हे सामाजिक वातावरण कलुषित होण्यामध्ये माध्यमांचा वाटा मोठा आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
मागच्या काही काळात माध्यमांमधील काही घटकांचा उतावीळपणा इतका वाढला आहे की आपण काय बातमी देत आहोत, त्याचे परिणाम काय याची कोणतीही खातरजमा करण्याची साधी गरज देखील त्यांना वाटत नाही. एखाद्या नेत्याच्या भाषणाची, वक्तव्याची बातमी देताना केवळ एखाद्या वाक्याला धरून बसायचे नसते तर त्याचे मागचे पुढचे संदर्भ पाहायचे असतात याचे साधे भान माध्यमांना राहिलेले नाही. मध्यंतरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी दोन नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे वृत्त चालविले गेले, त्यातील एका नेत्याने असे काही घडले नाही असे  स्पष्ट केले, दुसऱ्या नेत्याने प्रतिक्रियाच दिली नाही. मात्र यातून काही काळ पुन्हा जिल्ह्यातील सामाजिक वातावरण कलुषित होण्यासच हातभार लागला. त्यानंतरचा एक प्रकार, मंत्री पंकजा मुंडेंनी राजकारण सोडणार असल्याचे वक्तव्य केल्याची बातमी चालविली गेली, त्याभाषणात पंकजा मुंडे जसे महामार्गाला एक्झिट  असतात , तसे आपल्या तत्वाप्रमाणे राजकारण होत नाही असे वाटले तर माझ्या राजकारणाला देखील एक्झिट असतील असे म्हटले होते, याला थेट पंकजा मुंडे राजकारण सोडणार असे कसे म्हणायचे याचा विचार कोणीच करणार नसेल तर यातून काही काळासाठी टीआरपी मिळेल पण माध्यमांच्या विश्वासार्हतेचे  काय ? आ. धनंजय मुंडे स्वतःच्या  प्रकृतीविषयी चमत्कार दाखवावा लागेल असे स्पष्ट बोलले तर लगेच त्याला राजकीय संदर्भ, मध्यंतरी तुकाराम मुंडेंनी 'एका बैठकीत मला एक व्यक्ती म्हणाला की एका लोकप्रतिनिधींच्या पत्नीने फोन केला ?' असे सांगताच लगेच लोकप्रतिनिधीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या बातम्या असे एक ना अनेक प्रकार मागच्या काळात सुरु आहेत. खरेतर त्यावेळी माध्यमांनी तुकाराम मुंडेंनाच 'गॉसिप सोडू नका , काय माहिती असेल तर पुराव्यासह आणि नावासह मांडा ' असे सुनावयला पाहिजे होते, मात्र त्यामुळे टीआरपी थोडीच मिळणार आणि इतकी जबाबदारीची जाणीव  आता उरली आहे कुठे ?
एकीकडे माध्यमांचा असा उतावीळपणा असताना नेते तर अति उतावीळ. पंकजा मुंडे  राजकारण सोडणार असे म्हणाल्या अशी बातमी कोणी तरी चालवायची आणि काँग्रेसच्या प्रदेशपातळीवरच्या नेत्यांनी  लगेच त्यांना भाजपसोडून आमच्याकडे या , तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे म्हणायचे , पंकजा मुंडे खरोखर तसे म्हणाल्या का याची खात्री करावी असे काँग्रेसच्या नेत्यांना  देखील वाटू नये ? आणि ज्या जिल्ह्यात काँग्रेस मागच्या कित्येक वर्षात एखादा आमदार किंवा खासदार देखील निवडून आणू शकली नाही त्या जिल्ह्यातील नेत्याला  आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू असे आवाहन करायचे हे किती हास्यास्पद. दुसरा प्रकार पुन्हा काँग्रेसच्याच बाबतीतला. काँग्रेसच्या पेजवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया ' म्हटले गेले. निमित्त काय तर एका पत्रकारपरिषदेत म्हणे त्यांना पुरेसे बोलू दिले नाही, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाहीत. पुन्हा तेच अर्धवट व्हीडीओवरून चालविल्या जाणाऱ्या बातम्या आणि त्यावरच्या अतिउतावीळ प्रतिक्रिया, या प्रकरणावर व्यक्त होताना ती खरोखर पत्रकारपरिषद होती का केवळ उपमुख्यमंत्री निवेदन करणार होत्या याची खातरजमा तर करायची, पण नाही , तितका वेळ आणि तितकी जबाबदारीची जाणीव उरलीय कोणाकडे ? काँग्रेस काय किंवा आ. रोहित पवार काय, लगेच यावरून आपल्या राजकीय पोळ्या भाजायला मोकळे , पण यातून एकूणच माध्यमे आणि राजकीय नेत्यांची देखील विश्वासार्हता धोक्यात येतेय याचा विचार कोणी करायचा ?
या साऱ्या प्रकारात आज काही 'विशिष्ट 'नेते टार्गेट झाले म्हणून काही नेत्यांच्या भक्तांना किंवा काही सोशलमीडिया वीरांना आनंदाच्या उकळ्या फुटतीलही, पण असल्या उतावीळपणाची लागण झाल्यास तिचा फटका उद्या कोणत्याही नेत्याला बसू शकतो आणि मग मात्र कोणाला दोष देण्याची वेळ निघून गेलेली असेल याचाही विचार सर्वानीच करण्याची आवश्यकता आहे.
 

Advertisement

Advertisement