Advertisement

धारधार शस्त्र,दगडाने ठेचून तरुणाचा खून

प्रजापत्र | Sunday, 12/07/2026
बातमी शेअर करा

घाटनांदूर-अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवार (दि.११) रोजी रात्री एका २३ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय-२३,रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे.या जीवघेण्या हल्ल्यात त्याचे दोन मित्र देखील गंभीर जखमी झाला असून बीड जिल्ह्यात खुनांची मालिका अजूनही सुरूच असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.
       ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगाव या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता.  अण्णाभाऊ साठे चौकात आल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली.व काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडून ज्ञानेश्वरचा मृत्यु झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र सारतक तारशे,निखील उदार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.  या घटनेनंतर मयत ज्ञानेश्वरचे नातेवाईक रविवारी सकाळपासून तक्रार देण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बसून आहेत. अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नसून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच अधिकृत माहिती समजू शकणार आहे.

Advertisement

Advertisement