मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारपासून पावसाची तीव्रता अधिक वाढली. शनिवारीही पावसाचा जोर कायम असल्यामुळे राज्य शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून शनिवारी आणि रविवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात मुसळधार पावसाबाबतची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, राज्यासह मुंबई महानगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे-नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. कालपासून शासनाकडून लोकांना वेगवेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. विशेषतः या भागात ६ तारखेपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस असेल. वादळही येऊ शकते, अशाप्रकारचे अलर्ट दिलेले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, काही भागात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होईल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाकडून मुसळधार पाऊस असलेल्या भागांना दर तीन तासांनी एसएमएसद्वारे अलर्ट देत आहोत. नागरिकांनी हे अलर्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. पावसामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी लोकांना प्रवास टाळण्याची विनंती केली आहे.

