मुंबई :विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
राज्यात नुकत्याच ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील, असा दावा करण्यात येत होता. त्यातच आज ठाकरेंचं विधान परिषदमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.

