Advertisement

अंबाजोगाईतील तीन बेकायदेशीर ‘स्पा सेंटर‘ला ठोकले टाळे!

प्रजापत्र | Saturday, 27/06/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई: शहरातील पोखरी रोड आणि तथागत चौक परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन स्पा सेंटर्सवर पोलिसांनी शुक्रवारी, २६ जून रोजी धडक कारवाई केली. अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई करून तिन्ही स्पा सेंटर्सला टाळे ठोकले आहे.

शुक्रवारी अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाला शहरातील काही स्पा सेंटर्समध्ये बेकायदेशीर कृत्ये आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक फड, पोलीस अंमलदार खरटमल, खेलबुडे, खंदारे तसेच महिला पोलीस अंमलदार किर्दंत आणि भुसारी यांच्या पथकाने पोखरी रोडवरील दोन आणि तथागत चौकातील एका स्पा सेंटरवर अचानक छापे टाकले. या कारवाई दरम्यान स्पा सेंटर चालवण्याबाबतचे कोणतेही वैध परवाने आणि कागदपत्रे चालकांना सादर करता आली नाहीत.पोलिसांनी या कारवाईत तिन्ही स्पा सेंटर्स तात्काळ सील करून ते बंद केले आहेत. या धडक कारवाईमुळे अंबाजोगाई शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाई बद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement