Advertisement

 जुन्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

प्रजापत्र | Sunday, 21/06/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.२१ (प्रतीनिधी): शहरातील अंबाजोगाई रस्त्यावरील एका हॉटेल परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून दोन युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी घडली. या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पवन संगमेश्वर फुटके (वय ३३), रा. शास्त्रीनगर, परळी वैजनाथ यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पवन फुटके हे शुक्रवारी दुपारी शनेश्वर अर्बन निधी या बँकेतून २ लाख ५१ हजार ५०० रुपये काढून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचे मेव्हणे शंकर कौले यांनी फोन करून अभिजीत ढोपरे यांनी राजगड हॉटेल येथे बोलावल्याचे सांगितले.यानंतर पवन फुटके व त्यांचे सहकारी सोमनाथ वाघमारे हे राजगड हॉटेल येथे गेले असता, तेथे अनंत गणेश ढोपरे, संतोष जीवनराव शिंदे, अभिजीत गणेश ढोपरे व नरेश वाळके हे उपस्थित होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून अनंत ढोपरे यांनी पवन फुटके यांना मारहाण करत कॅबीनमध्ये ओढून नेले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांच्याकडील २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा अथवा गोंधळात ती हरवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.दरम्यान, पवन फुटके कॅबीनमधून बाहेर पडत असताना अभिजीत ढोपरे यांनी धारदार शस्त्राने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे, तर अनंत ढोपरे यांनी लोखंडी हत्याराने पाठीवर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हॉटेलबाहेर आल्यानंतर संतोष शिंदे यांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याने पवन फुटके यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेले शंकर कौले व सोमनाथ वाघमारे यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जखमींवर प्रथम परळी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

 

Advertisement

Advertisement