Advertisement

शिरूर कासारमध्ये शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा

प्रजापत्र | Tuesday, 16/06/2026
बातमी शेअर करा

 शिरूरकासार दि.१६(प्रतिनिधी) : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिरूर कासार येथे भव्य ट्रॅक्टर रॅली काढून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकविण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.
  माजी विरोधी पक्षनेते तथा आ.अंबादास दानवे यांच्या आदेशावर आणि जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने त्या आश्वासनाला हरताळ फासत जाचक अटी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले आहे. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून ती कर्जमाफी नसून कर्जवसुली असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख सोपान मोरे, किसान सेना तालुकाप्रमुख हरी मामा खेडकर, महिला संघटिका मीरा नवले, ठकसेन तुपे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, दीपक मोराळे, शिवाजी कुलकर्णी, सुभाष राऊत, मुकुंद शिंदे, अजय दाभाडे, अशोक जाधव, भोजराज पालीवाल, श्रीधर गरड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement