Advertisement

१० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक

प्रजापत्र | Saturday, 01/08/2026
बातमी शेअर करा

मुंबई : डॉक्टरांनी १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून सुमारे एक किलो वजनाचे चुंबक काढून त्याचा जीव वाचवला. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या या मुलाने खेळताना अनेक लहान चुंबक गिळले होते. त्यामुळे त्याच्या लहान आतड्यात गंभीर अडथळा निर्माण होऊन त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.

वेळेवर केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी सर्व चुंबक यशस्वीरीत्या बाहेर काढले. भाईंदर येथील रहिवासी रोहित वर्मा (नाव बदललेले) याला तीव्र पोटदुखी आणि सतत उलट्यांचा त्रास होत असल्याने त्याला वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. बदशाह खान यांनी तपासणीनंतर आतड्यात अडथळा असल्याचा संशय व्यक्त केला. एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये लहान आतड्यात धातूच्या अनेक वस्तू अडकलेल्या असल्याचे दिसून आले.त्यानंतर कोलोनोस्कोपी करण्यात आली. मात्र चुंबक मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे बालशल्यचिकित्सक डॉ. भावेश दोशी आणि डॉ. प्रदीप शेनॉय यांच्या पथकाने एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया करून लहान आतड्याच्या शेवटच्या भागातून चुंबकांचा मोठा साठा बाहेर काढला. शस्त्रक्रियेदरम्यान सी-आर्म इमेजिंगच्या सहाय्याने सर्व चुंबक पूर्णपणे बाहेर काढल्याची खात्री करण्यात आली. सुदैवाने आतड्याला छिद्र पडणे किंवा फिस्टुलासारखी गंभीर गुंतागुंत झाली नव्हती.

 

वेळीच उपचारांची गरज
डॉ. भावेश दोशी यांनी सांगितले, की विशेषतः ऑटिझम किंवा इतर विकासात्मक अडचणी असलेल्या मुलांनी चुंबक किंवा बटण बॅटरी गिळल्याचा संशय आल्यास अजिबात विलंब न करता तातडीने रुग्णालयात दाखल करावे. तसेच मॅग्नेटिक खेळणी, मॅग्नेटिक बीड्स, बटण बॅटऱ्या, नाणी आणि इतर लहान धातूच्या वस्तू मुलांपासून लांब ठेवाव्यात, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

Advertisement

Advertisement