परळी दि.१३ (प्रतिनिधी): परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून एका कर्मचाऱ्याचे अपहरण करून तब्बल पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जून रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय ५४, रा. संगम, ता. परळी वैजनाथ, सध्या थर्मल कॉलनी, परळी) यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन केले. पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका मारुती सुझुकी वाहनाचा मागोवा लागला. या वाहनाचा माग काढत तपास पथक अमरावतीपर्यंत पोहोचले.दरम्यान, आरोपींनी अपहृत तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डोळ्यावर पट्टी बांधून सोडून दिले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले.तपासात सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे (दोघे रा. परळी), अल्केश विष्णुजी अवजाडे व शुभम राजू पिंपळकर (दोघे रा. मंगरूळ चावला, जि. अमरावती) यांनी मिळून हे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. यापैकी संतोष नारायण वंजारे याला प्रथम अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात आला.आरोपी राज्याबाहेर पळाल्याची माहिती मिळाल्याने नागपूर, मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्ली येथे शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून परळी ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक मझरअली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, मारूती कांबळे,सचिन सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने,सचिन आंधळे, विकी सुरवसे,आसेफ शेख यांनी मिळून केली आहे.

बातमी शेअर करा
