मुंबई: गेल्या काही काळापासून विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामधून अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. मात्र या कर्जमाफी योजनेच्या अटीशर्ती आणि लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांबाबतच्या निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता २०१७ आणि २०१९ साली झालेल्या कर्जमाफीवेळी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,राज्य सरकारने अर्थसंकल्पामधून घोषित केलेल्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या विविध अटीशर्तींमुळे या कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार असा सवाला उपस्थित केला जात होता. तसेच याआधी राज्य सरकारने २०१७ आणि २०१९ साली दिलेल्या कर्जमाफीवेळी अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे यावेळी या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. तसेच या कर्जमाफीसाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत सुमारे ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच या कर्जमाफी योजनेसाठी सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

