बीड-हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून परळीच्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणाचे संबंध ठाकरे सरकारमधील मंत्र्याशी जोडले गेल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. ही नेमकी आत्महत्या होती की तिला कोणी मारलेे, याचा तपास करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने केली. तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांती पाटील यांनी नुकतेच गंभीर आरोप केले आहेत.
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय पूजा या तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली होती. तिचे मूळ गाव परळी (जि. बीड) आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही; परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही तक्रार अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित बड्या मंत्र्याचा या तरुणीसोबत असलेला संबंध पोलिसांनी शोधून काढला पाहिजे.
चौकट
ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते.