परळी दि.४(प्रतिनिधी): येथील तोहिद खान यांच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने अवघ्या ४८ तासात केला असून आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड व गौरव दीपक व्यास या दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने दोघांनी हा खून केल्याची कबुली दिली असल्याचे समजते.
अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मयत तोहिद खान हे तिघे दुपारपासून एका हॉटेलमध्ये दारू पित होते. संध्याकाळच्या सुमारास पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपींनी तोहिद खान यांना दगडाने ठेचून गंभीर मारहाण करत ठार मारल्याचे उघड झाले आहे.खुनानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ फेकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह रुळांपासून बाजूला ओढल्याने आरोपींचा बनाव फसला आणि संशय अधिक गडद झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून खुनाच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या ४८ तासांत प्रकरणाचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधिकारी चेतना तीडके,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.विष्णू सानप,आनंद मस्के,श्री.भताने,चालक नितीन वडमारे यांनी केली.

बातमी शेअर करा
