नागपूर : देशातील आर्थिक परिस्थिती, इंधन दरवाढ, आरक्षणाचा मुद्दा आणि धार्मिक तेढ यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी काळात देशात आर्थिक आणीबाणी आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा भीतीदायक इशारा नागरिकांना दिला आहे.
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "येत्या महिना-दीड महिन्यात डिझेल १५० रुपये तर पेट्रोल १७० रुपये प्रति लीटरवर पोहोचलेलं दिसेल. मध्यमवर्गीय माणसाला मारण्यासाठीच हे सरकार आलं आहे. देशात इंधन तुटवडा नाही असं सरकार सांगत असलं, तरी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी आरसी बुक दाखवून डिझेल दिलं जात आहे. हा तुटवडा नाही तर काय आहे? विमान सेवा रद्द होत आहेत.पुढे बोलताना त्यांनी जनतेला एक मोठा सल्ला दिला, "भविष्यात लॉकडाऊनसारखे दिवस येणार आहेत. तुमच्याकडे पैसे असतील तर ते सुरक्षित ठेवा, कुठेही मोठी गुंतवणूक करू नका; कारण ती परत मिळणार नाही. आरबीआय (RBI) रिकामी केली जात असून बँका पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

