Advertisement

 घरफोड्या करणारा सराईत आरोपीला बेडया

प्रजापत्र | Thursday, 28/05/2026
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.२८(प्रतिनिधी):शहरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने सराईत आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
      प्रभाकर रघुनाथ मुंडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत १३ मे ते १८ मे च्या दरम्यान सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना  घडली होती. याप्रकरणी मंगळवार (दि.१९) रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना २७ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे रा. सैनिक कॉलनी, मोरेवाडी, ता. अंबाजोगाई याने दोन साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती मिळाली. आरोपी यशवंतराव चव्हाण चौकाजवळ मोरेवाडी रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.यात संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. यावेळी चोरीतील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्प्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि शिवाजी बंटेवाड, पोस्टे अंबाजोगाई शहरचे प्रभारी शरद जोगदंड, पोउपनि सुशांत सुतळे, पोह.मारूती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, गोविंद भताने, युनूस बागवान,  गोविंद राख, पोअ/सचिन आंधळे, विकी सुरवसे, व पाडुरंग काळे यांनी केली.

Advertisement

Advertisement