Advertisement

मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Sunday, 17/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई :मामाची भेट घेण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत आरोपीला अटक केली आहे. सौरभ सोनावणे (वय, २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   न्यायालयाने सौरभला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

   मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथे राहणारी असून, तिचे मामा खोपोलीत राहतात. आपल्या मामाला भेटण्यासाठी ती रेल्वेने प्रवास करून कल्याण स्थानकावर आली. कल्याण स्थानकावर उतरल्यानंतर ती खोपोलीला जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थांबली. त्याच वेळी आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. आरोपीने पीडितेच्या जवळ जाऊन आधी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा बहाणा केला आणि घाबरवून रेल्वेच्या यार्डात घेऊन गेला. तिथे त्याने या १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला.या भयंकर प्रसंगातून पीडित मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. तिने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातील आणि यार्डाच्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे आरोपी सौरभ सोनावणेची ओळख पटवून पोलिसांनी त्याला काही तासांतच बेड्या ठोकल्या. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. रेल्वेस्थानकांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement