शिरूर कासार दि.१२(प्रतिनिधी): तालुक्यातील मानूर येथे सोमवारी मध्यरात्री लातूर येथील एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी चौधरी ट्रॅव्हल्स गतिरोधकावर जोरात आदळल्याने दरवाज्याजवळ बसलेला प्रवासी खाली पडला आणि बसच्या मागील टायरखाली चिरडला गेला. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील रहिवासी असलेले काशिनाथ महादेव बरिदे (वय ४०) हे लातूर ते नाशिक असा प्रवास ‘चौधरी ट्रॅव्हल्स’च्या क्रमांक एमएच २४ एफ ८००८ गाडीने करत होते. सोमवार (दि.११) रोजी रात्री दीडच्या सुमारास ही बस मानूर शिवारातील गतिरोधकावर आली असता, चालक सादिक खाजोद्दीन सय्यद याने गाडीचा वेग कमी न करता ती जोरात गतिरोधकावरून नेली. या भीषण धक्क्यामुळे ट्रॅव्हल्सचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि क्लिनर सीटजवळ बसलेले काशिनाथ बरिदे थेट खाली रस्त्यावर पडले. मागील चाक त्यांच्या डोक्यावरून,पायावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत काशिनाथ यांचे बंधू सचिन बरिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सादिक खाजोद्दीन सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने चालवून प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोह श्री.तांदळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

