राजकारणात अशक्य काहीच नसते, त्यामुळे राजकारणातील प्रत्येकाने मोठमोठी स्वप्ने पाहायला देखील हरकत नाही. अगदी थलापती विजय सारखा अभिनेता अत्यंत कमी काळात थेट निवडणुकीच्या माध्यमातून मोठे यश मिळवू शकत असेल, तर मग महाराष्ट्रासारख्या राज्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे काय, किंवा अगदी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार काय, त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असेल किंवा त्यांच्यात त्यांना पुढील मुख्यमंत्री दिसत असतील तर त्यात वावगे असे काही नाही, मात्र उघड्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिली जात असताना तितक्याच उघड्या डोळ्यांनी राजकीय वास्तव देखील पाहिले गेले तर त्याला काही अर्थ असेल.
तसे तर राजकारण कायम बिनभरवशाचा आणि अनिश्चिततेचा खेळ राहिलेला आहे. देशात काय किंवा महाराष्ट्रात काय, राजकारणात कोणत्यावेळी काय होईल आणि कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. बरे हे काही आजचे नाही, महाराष्ट्राला अशी नशीब मेहरबान असलेल्या नेत्यांची जुनीच परंपरा आहे. तसे नसते , तर जे बाबासाहेब भोसले कोणालाही, तुमच्या मंत्रिमंडळात मला घ्या म्हणायचे, ते स्वतःच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याला नशिबापलिकडे वेगळे काय म्हणणार? हा झाला जुना इतिहास , भाजप हा सर्वात मोठा पक्ष असताना आणि भाजपच्याच आशीर्वादाने शिवसेनेत फूट पडलेली असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होता आले आणि देवेंद्रांना त्यांचे 'उप' म्हणून काम करावे लागले ही राजकीय अपरिहार्यता देखील महाराष्ट्राने पाहिली आणि अनुभवली आहेच. त्यामुळे आता कोणालाही आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल किंवा आपल्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री दिसत असेल तर ते साहजिकच आहे.
विधानपरिषदेची ऑफर आल्यानंतर थेट शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडूंना मग आता आपली शक्ती एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या कामी खर्ची करण्याची भावना व्हावी हे देखील साहजिकच. एकनाथ शिंदेंना एकवेळ मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि आता अजूनही त्यांना ते पद नेहमीच खुणावत असतेच. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे जेव्हा शिवसैनिकांना वाटत असेल तर राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पाहिला तर बिघडले कुठे? म्हणूनच जय पवार देखील २०२९ ची निवडणूक सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून लढतील असे सांगून मोकळे झाले. या साऱ्या वक्तव्यांमुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश येतो, उत्साह येतो यासाठी राजकारण म्हणून हे योग्यच. पण या स्वप्नरंजनाचे वास्तव काय?
एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रात स्वतःचा बेस वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे भाजपच्या दिल्लीस्थित नेत्यांशी चांगले संबंध आहेतच , पण शिंदेंच्या पक्षाचा विस्तार भाजपला फारसा पचनी पडेल असे वाटत नाही. एकनाथ शिंदेंच्या उड्डाणांना मर्यादा कशा घालायच्या हे भाजपला माहित नाही असेही नाही. आताच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना स्वतःच्या खात्याचे देखील सारेच निर्णय घेता येतात असे नाही. मग शिंदेंच्या विस्तारवादाला भाजप आडवा येणार असेल तर शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना मर्यादा येणारच. जे शिंदेंचे त्यापेक्षा वाईट राष्ट्रवादीचे. अजित पवार हयात असेपर्यंत नाही म्हटले तरी भाजपला त्यांची भीती होती. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असलेला आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत जनाधार असलेला नेता अशी अजित पवारांची प्रतिमा होती आणि त्यांच्यातील बेधडकपणामुळे प्रसंगी कोणतीही राजकीय किंमत चुकविण्याची धमक अजित पवार दाखवू शकायचे. पण अजित पवारांच्या नसण्याने पक्षाचे सारे चित्रच पालटले आहे. पार्थ पवार यांच्या महत्वाकांक्षा राष्ट्रवादीमधील जुन्या ज्येष्ठांना कितपत पचतात हा विषय आहेच, सुनेत्रा पवारांना राजकारणात मर्यादा आहेतच. आज राष्ट्रवादीसमोर पक्षांतर्गत समतोल टिकविण्याचेच मोठे आव्हान आहे, उद्या सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांना भाजपपेक्षा जास्त जागा निवडणून आणाव्या लागतील आणि आज तरी महाराष्ट्रात तसे चित्र आहे असे कोणी म्हणणार नाही. मग सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावे कसे?
एकनाथ शिंदे काय किंवा सुनेत्रा पवार काय, भाजपसोबत त्यांचे मित्रपक्ष म्हणून राहून , मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवून उद्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असतील तर ती त्यांची देखील राजकीय अपरिपकवता आहे. भाजप मित्रपक्षांचे कसे मातेरे करते हे देशाने ठिकठिकाणी पाहिले आहे. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' अशी आपल्याकडे जुनी म्हण आहे, इतरांना ठेचकाळताना पाहून मागाहून चालणाराने शहाणे व्हायचे असते , शिंदे किंवा पवार, दोघांनाही ते राजकीय शहाणपण माहित असेलच, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर एकतर आपणच खरा विरोधी पक्ष आहोत म्हणून भाजपला अंगावर घेत मतदारांना सामोरे जावे लागेल नाहीतर मित्रपक्ष न राहता भाजपात समाविष्ट व्हावे लागेल, तसे न करता मित्रपक्षात राहून मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न म्हणजे दिवास्वप्नापलीकडे फार काही नसेल.

बातमी शेअर करा
