Advertisement

भावना’जीवी

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा

दिल्ली-राजधानी दिल्लीच्या सीमेवर तब्बल 70 दिवसांपासूनची अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. या आंदोलनाच्या विषयात सरकारची अवस्था अवघड जागेच्या दुखण्यासारखी झाली आहे. म्हणूनच या विषयात खुद्द पंतप्रधान देखील आता काहीही वक्तव्ये करताना दिसत आहेत. या आंदोलनाच्या संदर्भाने टीका करताना पंतप्रधानांनी विरोधकांना चक्क ’आंदोलनजीवी ’ म्हणून हिनवले आहे. आंदोलनजीवी हा शब्द वापरताना पंतप्रधान मोदी यांना हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरायचा होता हे त्यांच्या एकंदर देहबोलीवरून आणि त्यानंतर भाजपच्या आयटी सेलने या शब्दवरून जो जल्लोष केला त्यावरून स्पष्ट होते . अर्थात भाजपकडून आंदोलन या शब्दाची हेटाळणी होणे अपेक्षितच असून ते  भाजपच्या आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या संघ परिवार  यांच्या संकराप्रमाणे अपेक्षितच आहे.

आंदोलन हे  कोणत्याही समाजाच्या  आज मोदींना वाटते त्याप्रमाणे आंदोलन काही त्याज्य अशो गोष्ट नाही. मात्र मोदी काय किंवा संघ परिवार काय , यांना जनतेच्या प्रश्नाशी निगडित आंदोलनाशी कधीच काही देणे घेणे पूर्वीही नव्हते आणि आताही नाही. अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्यावेळी सारा देश ’भारत छोडो ’ सारख्या आंदोलनात उतरला होता , त्यावेळी संघ परिवार या आंदोलनापासून दूर होता, तर वाजपेयींसारखे नेते माफिनामे देत होते हे  वास्तव आहे. त्यामुळे जनतेच्या विषयातील आंदोलने हा भाजपचा पिंड नाही. मात्र ज्यावेळी एखाद्या विषयातून सत्ता मिळू शकते असे दिसले तर हेच भाजपवाले त्यांच्या संघ परिव्रतील सर्व सहकार्‍यांसह आंदोलनात उतरतात . आणीबाणीच्या अगोदरचे गुजरात आणि बिहारमधील आंदोलन असेल किंवा अगदी 2012 मधील दिल्लीच्या रामलीला मैदानावरचे ’अण्णा आंदोलन ’ . भाजपला जनतेसाठी नव्हे तर सत्तेसाठी आंदोलन हवे असते, मात्र त्यावेळी ते स्वतःला ’आंदोलनजीवी ’ म्हणवत नव्हते.

जर शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे हे आंदोलनजीवी असतील तर भाजपचा खरा चेहरा हा भावनाजीवी आहे असे म्हणावे लागेल. कारण भाजपसारखा पक्ष देशात वाढला तो भावनांचे राजकारण करतच .  80 च्या दशकाच्या शेवटी सुरु झालेले राम  मंदिर आंदोलन हा त्याचाच एक भाग होता. आडवाणींची रथयात्रा हा या आंदोलनाचा प्रमुख भाग होता, त्यातून हिंदूंच्या भावनांना हात घालून सत्तेचा सोपं चढणे हेच भाजपचे स्वप्न होते आणि आज शेतकरी आंदोलनावरून विरोधकांना ’आंदोलनजीवी ’ म्हणवणारे नरेंद्र मोदी हे त्यावेळी रथयात्रेचे  गुजरातमधील वाटाडे आणि  व्यवस्थापक होते. भावनेचे राजकारण करण्याचा भाजपचा रथयात्रा हा काही पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता असे नाही. गोध्रा कारसेवक जळीत कांडानंतर मयत कारसेवकांची प्रेते गावागावात नेऊन मिळविण्यात आली आणि त्यातून काय घडले हे सार्‍या देशाने अनुभवले आहे. हे घडले त्यावेळी आज इतरांना ’आंदोलनजीवी ’ म्हणून हिणवणारे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे जनतेच्या भावनांना हात घालणे भाजपसाठी नवीन नाही, मात्र असे करताना ते स्वतःला ’भावनाजीवी ’ म्हणवणारे नाहीत. त्यांच्याकडन अशा प्रामाणिक आत्मपरीक्षणाची अपेक्षा करणे हा भाजपवर अन्याय ठरेल.

Advertisement

Advertisement