आष्टी दि.११ (प्रतिनिधी): तालुक्यातील बावी फाट्यावर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कार आणि दुचाकीच्या हुलकावणीमुळे भीषण अपघात झाला. पाटोदा तालुक्यातील मारुतीची पांगरी येथे सासरवाडीच्या यात्रेसाठी कारने (MH 12 FF 3795) निघालेले हाजीपूर येथील संतोष गोल्हार आणि त्यांची पत्नी या अपघातात जखमी झाले आहेत.
दुचाकीस्वाराने अचानक हुलकावणी दिल्याने गोल्हार यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने चार पलट्या घेतल्या.अपघाताची भीषणता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन चार वेळा उलटली. या अपघातात संतोष गोल्हार यांच्या पत्नी, ज्या गरोदर आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तीव्र वेदना होत असल्याने तातडीने आष्टी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.अपघात होताच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना बावी येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आष्टीला हलवण्यात आले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा
