Advertisement

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

प्रजापत्र | Tuesday, 31/03/2026
बातमी शेअर करा

 मुंबईः दिव्यांग कल्याण विभागाचा कायापालट करतानाच बोगस संस्थांची दुकानदारी बंद करणारे दिव्यांग कल्याण विभागाचे धडाडीचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिवपदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्य प्रशासनात मोठे फेरबदल केले असून मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली आहे.

विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), श्रीमती विनिता वैद सिंघल प्रधान सचिव यांची मृद व जलसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे.परिमल सिंग यांची सचिव (कृषी) म्हणून तर तुकाराम मुंढे यांची सचिव, आपत्ती व्यवस्थापन येथे नियुक्ती करण्यात आले आहे. लहू माळी यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड,माणिक गुरसाल यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभागात तर श्रीमती प्रेरणा देशभ्रतार सह आयुक्त, राज्य कर, मुंबई यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची महापालिका आयुक्त, वसई विरार महानगरपालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement