Advertisement

 राज्यात बनावट जात वैधता प्रमाणपत्राचा भांडाफोड

प्रजापत्र | Tuesday, 31/03/2026
बातमी शेअर करा

नागपूर : अनुसूचित जमातीच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पितळ उघडे पडले आहे. राज्याच्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) ने अशा विद्यार्थ्यांची यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे (टीआरटीआय) कडे पाठविली असून, यांच्या वैधता तपासून अहवाल मागितला आहे. 'टीआरटीआय'ने यासंदर्भात राज्यातील १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे त्या याद्या पाठविल्या असून, नागपूर समितीने पाचगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणी राज्यात पहिला गुन्हा नागपुरात दाखल झाला आहे.

      'टीआरटीआय'ने नागपूर समितीकडे ४० विद्यार्थ्यांचे पडताळणी प्रमाणपत्रांचे अहवाल मागितले होते. हे विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीएसारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित असून, अनुसूचित जमातीचा लाभ घेत आहेत. या ४० पैकी ३ विद्यार्थ्यांनी समितीकडे वैधतेसाठी अर्ज केले होते. त्या ३ विद्यार्थ्यांची समितीने सुनावणी घेतली. या विद्यार्थ्यांना समितीने अजूनही प्रमाणपत्र दिले नसताना त्यांनी सीईटी सेलकडे पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते.

समितीच्या तपासात यात ११ जण दोषी आढळले. यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचाही समावेश आहे. हे महाविद्यालय पाचगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने समितीच्या दक्षता पथकाने पाचगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. तर उरलेल्या ३७ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वैधतेसंदर्भात नागपूर समितीकडे कुठलेही अर्ज आलेले नाही. त्यामुळे नागपूर समितीने ३७ विद्यार्थ्यांच्या वैधता आमच्याकडून देण्यात आल्या नाहीत आणि तीन विद्यार्थ्यांच्या प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती टीआरटीआयला कळविली असल्याचे नागपूर समितीचे उपसंचालक नीरज मोरे यांनी सांगितले.सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील पंधराही समित्यांना 'टीआरटीआय'ने विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यास सांगितले आहे. यात बनावट वैधता प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे.पोलिस स्टेशन पाचगाव येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अभियांत्रिकी कॉलेजचा प्राध्यापक, दोन सहायक प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे ३ दलाल आदींचा समावेश आहे.आरोपींविरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४),३३८, ३३६(३), ३४० (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक वृष्टी जैन यांनी दिली.

Advertisement

Advertisement