Advertisement

संपादकीय अग्रलेख- सत्य लवकर समोर यावे

प्रजापत्र | Thursday, 26/02/2026
बातमी शेअर करा

 राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर लगेच त्यांच्या अपघाताबद्दल अनेक कुतर्क सुरु झाले होते, त्यावर लगेच स्वतः शरद पवारांनी 'हा अपघातच आहे ' असे स्पष्ट केले. मात्र आता त्यांचेच नातू असलेले आ. रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भाने अनेक प्रश्न उपस्थित केल्याने एकूणच या साऱ्या प्रकाराबद्दल जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे. कोणत्याही नेत्याच्या मृत्युबद्दलचे गूढ अशा प्रश्नांनी वाढत असते. त्यामुळेच या प्रकरणाचे राजकारण होऊ द्यायचे असेल आणि कोणी ते करू नये असे सरकारला खरोखर वाटत असेल तर या प्रकरणातील सत्य तातडीने समोर कसे येईल यासाठीची आग्रही भूमिका राज्य सरकारने घ्यायला हवी
 
    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला २ दिवसांनी एक महिना होईल. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अचानक झालेला अपघात या सर्वांसाठीच धक्का होता. त्यामुळे मग अशा अपघाताबद्दल कोणाच्याही मनात प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. अजित पवारच काय, कोणत्याही व्यक्तीचे अपघाती निधन झाले की साहजिकच अपघात का घातपात असा प्रश्न निर्माण होत असतोच. महाराष्ट्रात यापूर्वी देखील अनेक राजकीय नेत्यांच्या अपघाती मृत्यूनंतर दीर्घकाळ त्या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शंका कुशंका कधी दबक्या आवाजात तर कधी जाहीरपणे व्यक्त होत आलेल्या आहेतच. त्यामुळे आज अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल प्रश्न निर्माण होत असतील तर त्यात गैर काहीच नाही.
भलेही अजित पवारांच्या निधनानंतर लगेच स्वतः शरद पवारांनी हा अपघाताचं आहे, घातपात नाही असे स्पष्ट केले असेल, मात्र त्यानंतर काही दिवसातच त्यांचे नातू आ. रोहित पवारांनीच या संपूर्ण प्रकरणात प्रश्नच प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ राज्यात नव्हे तर दिल्ली जाऊनही आ. रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत. आ. रोहित पवारांचे अजित पवार हे काका होते आणि त्यामुळे त्यांना अधिक भावनिकता वाटत असेल असे म्हणून या प्रश्नांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करू पाहत असेल तर त्यामुळे सामान्यांच्या मनात या प्रश्नाबद्दलचे गूढ आणखी वाढणार आहे. आ. रोहित पवार यांनी एकूणच विमानाचा दर्जा, विमान कंपनीचे लागेबांधे , अचानक बदललेला पायलट, अजित पवारांना अचानक विमानाने निघण्याचा घ्यावा लागेलला निणय असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. आणि या मुद्द्यांना समाधानकारक उत्तर मिळावे अशी महाराष्ट्राची देखील इच्छा आहे. आ. रोहित पवारांनी यांसंदर्भाने पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही हे आता समोर येत आहे. अर्थात अशा एखाद्या घटनेत तांत्रिक अहवाल येईपर्यंत पोलीस फार काही भूमिका घेऊ शकणार नाहीत हे आ. रोहित पवारांना माहित नाही असे नाही, मात्र त्यांना त्यांचा रस्त्यावरचा लढा लढायचा आहे. पण ज्यावेळी एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर असा संशयकल्लोळ निर्माण होतो त्यावेळी तो संशय दूर करण्याची जबाबदारी सरकारची असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी यासंदर्भाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी 'आम्ही या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचे उत्तर शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही 'असे सांगितले. स्वतः सुनेत्रा पवारांनी देखील या संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याचे सांगितले. पण हे सारे असले तरी या चौकशांचा अहवाल कधी येणार हा मोठा प्रश्न आहे. सरकारला जर खरोखर या प्रकरणाला राजकीय वळण येऊ नये असे वाटत असेल तर सत्य लवकर समोर यावे यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

Advertisement

Advertisement