मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे (Ajit Pawar Death) संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.
अजितदादांच्या अकाली निधनाने राज्याला मोठा धक्का बसला असून, या दु:खातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. “व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” अशा भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या.या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे किंवा कोणतेही सोहळे आयोजित करणे उचित वाटत नसल्याचे सांगत, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य जपण्याचे आवाहन केले आहे. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ अथवा कार्यक्रम आयोजित करू नये, अशी विनंती त्यांनी कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांना केली आहे.

