Advertisement

लाडक्या बहिणींसाठी पहिली आणि शेवटची संधी!

प्रजापत्र | Friday, 06/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई: 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

नेमकी चूक काय झाली होती? योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अनेक महिलांनी e-KYC पूर्ण केले. मात्र, कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबतचा (Pension) पर्याय निवडताना अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती भरली गेली. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले होते. जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली, तरी प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे.३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत ज्या महिलांच्या अर्जात 'कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्तीवेतन घेणे' या पर्यायाबाबत चूक झाली आहे, अशा महिलांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येईल.

 

शासनाचे स्पष्ट निर्देश:

ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी लाभार्थी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (सांकेतांक: २०२६०२०६१२१२२३१३३०) पाहू शकतात. आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत e-KYC मधील ही सुधारणा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement