जालना : भोकरदन तालुक्यातील लोणगाव परिसरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रताळी काढणीला वेग आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी उपवासाच्या दिवसांत फराळासाठी रताळ्याला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांनी सध्या काढणीवर भर दिला आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे उत्पादन चांगले झाले असून, रताळी शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
लोणगाव येथील बहुतांश शेतकरी १ ते ५ एकरपर्यंत रताळ्याची लागवड करतात. विशेष म्हणजे, अल्पभूधारक शेतकरीही किमान १० गुंठ्यांत रताळी पीक घेत असून, त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. यंदा शेतकरी ओंकारसिंह शेखावत यांनी ५ एकरात रताळीचे पीक घेऊन १० लाखांचा निव्वळ नफा होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या मजुरांच्या साह्याने रताळी काढण्याचे काम सुरू असून, एकरी २५० क्विंटल उत्पादन निघत असल्याचे शेखावत यांनी सांगितले. लागवडीपासून ते काढणीपर्यंत केवळ एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.रताळी हे आरोग्याच्या दृष्टीने पोषक पीक असून, महाशिवरात्रीसारख्या उपवासाच्या दिवशी त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी जुलै महिन्यात लागवड करून महाशिवरात्रीपूर्वी काढणी करतात. हे पीक कमी खर्चात, कमी कालावधीत तसेच हलक्या प्रतीच्या जमिनीतही चांगले येत असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे.
सध्या गावात ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साह्याने रताळी काढणी सुरू असून, काढलेली रताळी पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी तयार केली जात आहेत. महाशिवरात्री जवळ आल्याने जालना, अहिल्यानगर, केज, धारूर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठोक भावाने खरेदी करत आहेत. काही शेतकरी मात्र स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे. यंदा दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

