मुंबई : दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारले जाणार आहे. बिहार सरकारने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून राज्याची प्रगती आणि सार्वजनिक कल्याणासाठी प्रशासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या प्रकल्पाला राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत तब्बल ३१४.२० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलफिन्स्टन इस्टेट परिसरात या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बिहार भवनामुळे सरकारी कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच बिहारहून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. या बिहार भवनाची चर्चा राज्यभरात होत असताना मनसेने या प्रकल्पास कडाडून विरोध दर्शवला आहे. मात्र शिंदे शिवसेनेने या महत्त्वकांशी प्रकल्पास पाठिंबा दिला आहे.
मुंबईत उभारल्या जाणाऱ्या या बिहार भवनाबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र ''आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही'' असे म्हणत मनसेने मुंबईतील बिहार भवनास विरोध दाखवला आहे. नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बिहार भवनबाबत असे म्हटले की, काहीही झालं तरी आम्ही हे बिहार भवन बनवू देणार नाही. इथे आमच्या मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या राज्यात सोडवा. आमच्यावर भार कशासाठी? बिहारमधील रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधा. ते उपचारांसाठी मुंबईत येतात म्हणून इथे बिहार भवन बांधण्यापेक्षा तुमच्या राज्यात चांगली हॉस्पिटल उभारा. आम्ही हे बिहार भवन होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मुंबईत सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावे
दरम्यान, मनसेने बिहार भवनास मनसेने विरोध दाखवला असताना शिंदे शिवसेनेने या प्रकल्पास पाठिंबा दिला आहे. 'मुंबईत बिहार भवन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी बांधले जाणार आहे. त्यामुळे याला विरोध करणे चुकीचे आहे. मुंबईत यूपी भवन उभारले आहे, तर आता बिहार भवनची काय अडचण आहे? प्रत्येक राज्याची एकमेकांशी बांधिलकी असणं महत्त्वाचं आहे. यामुळेच देशाची प्रगती होते. बिहारमधून मोठ्या संख्येने कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांची व्यवस्था करण्यात काय चूक आहे?' असे शिवसेना (शिंदे) नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईत सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावेत, जेणेकरून बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

