बीड दि.१८ (प्रतिनिधी): पेंडगाव येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून येत असताना जातेगाव फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे.
पेंडगाव येथे अमावास्येनिमित्त देवदर्शनाचे मोठे महत्त्व असते. याच श्रद्धाभावातून मंगरूळ क्रमांक २ येथील अमर पंडितराव बापमारे (वय २६) व नाना उद्धव बापमारे हे दोन तरुण शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकीवरून देवदर्शनासाठी निघाले होते. माजलगावकडून गढीच्या दिशेने जात असताना, जातेगाव फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या उसाच्या ट्रकने (क्र. एमएच ११ एएल ०५१८) भीषण धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होती की, दुचाकीचालक अमर बापमारे याचा जागीच मृत्यु झाला आहे. या अपघातात दुसरा तरुण, नाना बापमारे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

