मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते उत्तम जानकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.’एकत्र यायचं असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी अजित पवारांना उद्देशून केलं आहे.

