Advertisement

झेडपीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर लढणार?

प्रजापत्र | Sunday, 18/01/2026
बातमी शेअर करा

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा धक्का बसला. महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे.

      पुण्यासह राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अजित पवार आणि शरद पवार यांची बारामतीत शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाल्याची चर्चा आहे.जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कोणतीही आघाडी असली तरी चिन्ह हे एकच असलं पाहिजे’, असं वक्तव्य कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर निवडणूक लढणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

Advertisement