Advertisement

बईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

प्रजापत्र | Saturday, 17/01/2026
बातमी शेअर करा

मुंबई : अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेला काठावरचं बहुमत मिळालं आहे. तर विरोधी पक्षातील ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेससह इतर पक्षांच्या नगरसेवकांची गोळाबेरीज देखील बहुमताजवळ जाणारी आहे. त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत सूचक विधान केलं आहे. मुंबईत आपला महापौर बसावा अशी इच्छा आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

   आज उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला. 
उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.  दरम्यान, काल लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला ११८ जागांवर विजय मिळाला. त्यात ८९ जागांवर भाजपाचे तर २९ जागांवर शिंदेसेनेचे नगरसेवक निवडून आले. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यात उद्धवसेनेला ६५, मनसेला ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. तसेच एमआयएमला ८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ३ आणि उर्वरित जागा इतरांना मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीबाबत चुरस वाढली आहे.   

Advertisement

Advertisement