लातूर : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या लातूर शहरातून आठवणी पुसून टाकण्याची भाषा काल-परवा कोणी तरी इथ येऊन बोलून गेलं. पण कोणी कोणाची ओळख अशी पुसून टाकू शकत नाही. भावनिक मुद्दा करून चालणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला. २००४ मध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त आमदार निवडून आलेले असताना सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांनी तेव्हा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण अजित पवारांनी करून दिली.
लातूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे राज्यात जेव्हा सरकार होते तेव्हा काँग्रेसचे आमदार संख्येने राष्ट्रवादी पेक्षा कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने हे करून दाखवले होते हे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

