लातूर : ऊसतोडणीवेळी बाजूला पडलेला ऊस हार्वेस्टरमध्ये टाकताना अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत (४०, रा. आशिव, ता. औसा) या शेतकऱ्याच्या शरीराचे कांडके उडाल्याची हृदयद्रावक घटना औसा तालुक्यातील आशिव येेथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा तालुक्यातील आशीव येथील शंकर सावंत यांच्या शेतातील उसाला कारखान्याची तोड आली होती. त्यामुळे ते शेतात होते. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हार्वेस्टरद्वारे ऊस तोड सुरू होती. काही ऊस बाजूला पडल्याने तो हार्वेस्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न शेतकरी शंकर सावंत करीत होते. तेव्हा, अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. शंकर सावंत हे शेतात दुपारनंतर न दिसल्याने पत्नी व मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दीड ते दोन तासांनंतर उसाच्या काकरीमध्ये त्यांचा मोबाइल आणि चप्पल आढळून आली. त्यामुळे त्यांनी हार्वेस्टर चालकास विचारणा केली असता, मला काहीही माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे माय-लेकराने पुन्हा शोध घेणे सुरू केले. मात्र, रात्री ७ वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
पोलिस फडात आल्यानंतर समजले
हार्वेस्टर चालकास शेतकरी शंकर सावंत हे मशीनमध्ये अडकून मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ मशीन बंद केली आणि मालकास माहिती दिली. मालकाने भादा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथक रात्री ७ वाजता उसाच्या फडात दाखल झाले, तेव्हा पत्नी व मुलास घटनेची माहिती समजली.
म्हणे, मशीनमध्ये बिघाड
मयत शंकर सावंत यांची पत्नी व मुलगा हे वडिलांचा शोध घेत असताना, चालकास हार्वेस्टर का बंद केले आहेस, असे विचारले. तेव्हा चालकाने मशीनमध्ये बिघाड झाला आहे, असे सांगून घडलेल्या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. रात्री पोलिसांचे पथक शेतामध्ये आले आणि त्यांनी शंकर सावंत यांचा मृतदेह मशीनमधून बाहेर काढला. अधिक तपास सपोनि. महावीर जाधव हे करीत आहेत.

