बीड दि. २४ (प्रतिनिधी ) : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सदस्यांचे राजपत्र देखील प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे.यापूर्वी मागील सभागृहाची मुदत संपल्यानंतर लगेच नवीन सभागृहाची बैठक बोलावली जायची, मात्र आता मागच्या ४ वर्षांपासून प्रशासक असल्याने सभागृह रिक्त आहे. अशावेळी आता पहिली बैठक राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून २५ दिवसाच्या आता बोलवावी असे निर्देश असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नगराध्यक्षांकडे पुरेसे बहुमत नाही , तेथे त्यांना जुळवाजुळवी साठी तब्बल २५ दिवस मिळणार आहेत.

राज्यात नगरपालिका निवडणुका पार पडल्या असून नगरपालिकांचे कारभारी निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते आणि त्यात उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या निवडी कधी होतात याची उत्सुकता आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि सभागृहातील बहुमत मात्र दुसऱ्या पक्षाकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता सभागृहाच्या पहिल्याच बैठकीत बहुमताचे 'नियोजन' करताना नेत्यांचा कस लागेल असे चित्र आहे.यापूर्वी सभागृहाची मुदत संपायला काही दिवस बाकी असताना निवडणुका व्हायच्या आणि जुन्या सभागृहाची मुदत संपली की लगेच नवीन सभागृहाची पहिली बैठक बोलावली जायची . आता मात्र याबाबतीत वेगळंच पेच समोर आलेला आहे. राज्यातील बहुतांश नगरपालिकांची मुदत संपून तीन ते चार वर्ष झाले आहेत. त्यामुळे आजच्या तारखेस सभागृ रिक्त आहे. अशावेळी बैठक बोलविण्यासाठी काय करायचे हा प्रश्न समोर आलेला आहे. यासंदर्भाने नवीन सदस्यांची यादी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर पहिली बैठक बोलविण्याचे अधिकार अध्यक्षांचे असून त्यासाठी ते २५ दिवसांचा वेळ घेऊ शकतात असे समोर येत आहे. अध्यक्षांनी राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसाच्या आत बैठक बोलवावी असे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीत तो निर्णय त्या त्या नगराध्यक्षांचा असणार आहे.
ज्या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षांना बहुमताची अडचण आहे, तेथे आता नव्या निर्देशांप्रमाणे जुळवणी करायला नगराध्यक्षांना भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई आदी ठिकाणी नगराध्यक्ष पहिली बैठक कधी बोलावतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर गेवराई, धारूर , परळी मध्ये मात्र बहुमताची अडचण नसल्याने या पालिकांची पहिली बैठक केव्हाही होऊ शकते. माजलगाव मध्ये नगराध्यक्ष चाऊस यांच्याकडे थेट बहुमत नसले तरी त्यांना ते जुळविणे फारसे अवघड नाही. त्यामुळे येथेही २५ दिवसांची मुदत वापरली जाण्याची शक्यता फारशी नाही. मात्र बीड आणि अंबाजोगाईच्या बाबतीत काय निर्णय होतो याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
२०१६ मध्ये देखील निर्माण झाला होता पेच
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीनंतर देखील बीडमध्ये असाच पेच निर्माण झाला होता. २०१६ मध्ये बीड नगरपालिकेची २७ नोव्हेंबरला मतदान तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांच्याकडे सभागृहात बहुमत नव्हते. त्यामुळे सभागृहाची पहिली बैठक अनेक दिवस लांबली होती. अखेर १० जानेवारी २०१७ ला पहिली बैठक ठरविण्यात आली. मात्र तोपर्यंत देखील अपेक्षित जुळणी न झाल्याने अध्यक्षांनी ऐनवेळी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दाखवत बैठक पुढे ढकलली होती. सभागृहाची पहिली बैठक नगराध्यक्षांच्या उपस्थितीशिवाय होऊ शकत नसल्याने त्यावेळी विरोधकांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता,. अखेर त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १२ जानेवारीला ३ दिवसाच्या आता बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

