देशाच्या राजकारणात एकेकाळी जी परिस्थिती काँग्रेसची होती , आज त्या परिस्थितीत भाजप आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते आणि आता या पक्षाला कोणी तरी एकट्याने आव्हान देणे म्हणजे देखील स्वप्नरंजन वाटावे अशी परिस्थिती आहे. भारतीय राजकारणातील हे कटू असले तरी वास्तव आहे. आज भाजपला कोणत्याच निवडणुकांसाठी इतर पक्षांची तशी फारशी आवश्यकता आहे असे मुळीच नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये तर नाहीच. त्यामुळे आता भाजपला विरोध करायचा असेल तर एकत्र येण्याची आवश्यकता आहे ती इतरांना ,कदाचित म्हणूनच दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतानाच आता दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांचा बाजार गरम झाला आहे. आणि ही दोन्ही पवारांची राजकीय अपरिहार्यता देखील आहे.
मागच्या एका दशकात देशाच्याच राजकारणात मोठ्याप्रमाणावर बदल झाले. नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात आले आणि त्यांनी देशभर भाजपचा जनाधार वाढवायला सुरुवात केली, त्यासाठी कोणताच विधिनिषेध बाळगण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही . आणि आज भाजप देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. एकेकाळी काँग्रेसच्या बाबतीत देशात अशीच अवस्था होती. त्यावेळी एस एम जोशींसारखे लोक काँग्रेसचा पराभव केवळ काँग्रेसचं करू शकते असे म्हणायचे. आता भाजपच्या बाबतीत तर तसे म्हणण्याची देखील सोय सध्या तरी नाही. इतका या पक्षावर मोदी शहा जोडीचा एकछत्री अंमल आहे, आणि म्हणूनच आता विरोधीपक्षांना जास्त काळजी करण्याची आवश्यकता आहे . त्यापलीकडे जाऊन ही काळजी केवळ विरोधी पक्षाला करायची आहे असे नाही , तर आज भाजपसोबत मित्र म्हणून असलेल्या पक्षांना देखील याची काळजी करावीच लागणार आहे. कारण 'कुबड्या नको' हे भाजपचे धोरण या पक्षाने यापूर्वीच अनेकदा स्पष्ट केले आहे.
आज महाराष्ट्रात भाजपला एकट्याने आव्हान देण्याची क्षमता कोणत्याही एका पक्षात राहिलेली नाही. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला नगरपालिकांमध्ये जे यश मिळाले त्यावरून हे स्पष्ट झाले आहेच. त्यामुळेच आता महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यात जमा आहेत. त्यांची एकी होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले होते, मात्र ठाकरे ब्रँड टिकविणे आपल्या इगोपेक्षा अधिक महत्वाचे आहे ठाकरेंनी ओळखले. आता बारी पवारांची आहे. आज फडणवीस, शिंदे आणि पवार महायुती अभ्येद्य आहे असे कितीही म्हणत असले तरी २०२९ चे भवितव्य काय असेल याची पुरती कल्पना अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना आहे.एकनाथ शिंदेंचे एकवेळ ठीक आहे, त्यांना भाजपच्या 'हिंदुत्वात ' स्वतःला लपेटून घेणे फारसे अवघड जाणार नाही. मात्र अजित पवारांची अडचण वेगळी आहे. त्यांचा मतदार हिंदुत्ववादी नाही, काकांपासून वेगळे झाल्यानंतरही त्यांना 'फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव, धर्मनिरपेक्षता ' असल्याचं गोष्टी बोलावया लागतात , त्यामुळे २०२९ चा सामना कोणी काहीही म्हटले तरी देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार असाच होणार आहे. काँग्रेसची जी वाटचाल सध्या सुरु आहे, ती पाहता २०२९ मध्ये या पक्षाकडे महाराष्ट्रात लढण्याची शक्ती आणि क्षमता किती राहिलेली असेल यावर भाष्य करणे अवघड आहे. आणि त्यामुळेच आता अजित पवारांना देखील भज पलीकडे जाऊन आपला जनाधार बळकट करण्यासाठी भूमिका घ्यावी लागणार आहे. स्थानिक निवडणुकांसाठी दोन्ही पवारांनी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत, त्या चर्चांचा कार्यकारणभाव हाच आहे. एकटे अजित पवार भविष्यात भाजपला आव्हान देऊ शकतील का? याचे उत्तर होकारार्थी देणे आज तरी शक्य नाही, आणि त्यामुळेच पुन्हा 'पवार ' म्हणून एकत्र आल्याशिवाय स्वतःची शक्ती टिकविता येणे अवघड आहे याची जाणीव अजित पवार आणि शरद पवार दोघांनाही आहे. एकत्र येणे हे ठाकरेंचे असेल किंवा पवारांचे , ती त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे, अगदी बीड जिल्ह्यात मुंडे बहीण भावांबद्दल काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यामुळे राजकारणात एकेकाळच्या जवळच्यांना एकत्र येणे ही आज अपरिहार्यता आहे. भविष्यात हीच अपरिहार्यता बीडच्या बिंदुसरेपासून मुंबईच्या 'सागरा'पर्यंत अनेकांची होणार आहे.

