Advertisement

  भैरवनाथ शुगरचा पहिला गळीत हंगाम सुरु

प्रजापत्र | Tuesday, 23/12/2025
बातमी शेअर करा

वाशी दि.२३(प्रतिनिधी): तालुक्यातील इंदापूर येथील पूर्वीचा नरसिंह व सध्या भैरवनाथ शुगर वर्क्स युनिट क्रमांक ७ या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम तब्बल तेरा वर्षांनंतर सोमवारी (दि.२२) पुन्हा सुरू झाला. उसाची मोळी कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व व्हाइस चेअरमन केशव सावंत यांच्या हस्ते गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
        यावेळी बोलताना चेअरमन अनिल सावंत यांनी शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढवून चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला पुरवावा असे आवाहन केले. तसेच भविष्यात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऊसतोडीचा प्रश्न निर्माण होत असल्याने ठिबक सिंचन पद्धतीने ऊस लागवड करावी व ऊसतोडीसाठी हार्वेस्टरचा अधिकाधिक वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल यासाठी आ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.पुढे बोलताना सावंत म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात भैरवनाथ शुगर वर्क्सच्या चार कारखान्यांद्वारे आतापर्यंत सुमारे सहा लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बंद पडलेला नरसिंह कारखाना तसेच तेरणा कारखाना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांची ऊस वाहतुकीची अडचण दूर करण्यात आली आहे. भविष्यातही शेतकऱ्यांसाठी काम करण्याची हीच रणनीती राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, विभीषण खामकर, शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, उपतालुका प्रमुख विकास तळेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मांगले, नगरसेवक शिवहार स्वामी, रणजीत घुले, सरपंच गणेश गपाट यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement