जालना :येथील अंबड चौफुलीजवळ कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या सागर धानुरे (वय ३२) याने आत्महत्या केलेली नसून त्याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी चोवीस तासांच्या आत दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले.
बन्सल यांनी सांगितले की, कल्याण भोजने यास जालना येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले असता प्रथम त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. तांत्रिक माहितीच्या आधारे विचारपूस केली असता सागर धानुरे आणि त्याच्यात पैश्यांच्या देवाणी-घेवाणीवरून वाद होते त्याने असे सांगितले. कमलेश झाडीवाले आणि धानुरे यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून वाद झाल्याचे समजल्यावर भोजने याने झाडीवाले यास धानुरेस जीवे मारण्यासाठी पंचवीस लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी धानुरे याच्या खूनाचा कट रचला. २० डिसेंबर रोजी रात्री भोजने याने धानुरे गास कलावती रुग्णालयासमोर बोलावले आणि त्याची माहिती झाडीवाले यास दिली. त्यानंतर झाडीवाले कारमध्ये धानुरे याच्या शेजारी बसला आणि बोलण्यात व्यस्त करून गावठी रिव्हॉल्व्हरने त्याच्या गळ्याजवळ दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर धानुरेच्या छातीवर व गळ्यावर चाकूने वार केले आणि नंतर तो घरी निघून गेला.धानुरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आला तेव्हा तो तेथेही गेला होता. जालना शहरातील नागेवाडी टोलनाक्याजवळ अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे बन्सल यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना देण्यात आल्या होत्या. दोन्ही आरोपींना तपासाठी कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

