Advertisement

लस मिळणार असेल तर आनंदच, पण‘मुहूर्ता’साठी हसू होऊ नये

प्रजापत्र | Saturday, 04/07/2020
बातमी शेअर करा

सारे जग कोरोनाच्या संसर्गाने हतबल झालेले असतानाच भारताच्या आयसीएमआर या आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेने 15 ऑगस्टपूर्वी कोरोनावर संपूर्ण भारतीय लस येईल असा दावा केला असून त्या अगोदर रुग्णांवरच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण करण्याचे निर्देश 12 संस्थांना दिले आहेत. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांच्या या दाव्यामुळे आनंदाचे चित्र निर्माण झाले असले तरी आता त्यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लस मिळणार असेल तर आनंदच आहे मात्र एखादा ‘मुहूर्त’ साधण्यासाठी अर्धवट तयारीवर जगासमोर हसू होणार नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे.


आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी 2 जुलै रोजी देशातील 12 संस्थांना पत्र लिहून कोरोनावरची पहिली संपूर्ण भारतीय लस 15 ऑगस्टपूर्वी देण्याच्या दृष्टीने गतीने काम करण्याचे निर्देर्ष दिले आहेत. भारत बायोटेक या हैद्राबादच्या कंपनीने ही लस तयार केली असून हा आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा यांचा संयुक्त उपक्रम आहे. सदर लसीच्या ‘प्री क्लिनिकल’ चाचण्या सुरु असून कंपनीला  क्लिनिकल चाचण्यांसाठी औषध नियामकांची परवानगी मिळाली आहे, तरी 7 जुलैपर्यंत लसीसाठी चाचण्यांना सामोरे जाण्याची तयारी असणार्‍या स्वयंसेवकांची नोंदणी करावी आणि तातडीने चाचण्या पूर्ण कराव्यात असे निर्देश दिले आहेत. 15 ऑगस्टपूर्वी ही लस उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा मानस असून या प्रकल्पात ‘वरिष्ठ’  पातळीवरून लक्ष घालण्यात आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. जगातली कोरोनावरची पहिली लस भारतात तयार होणार असेल तर सर्वच भारतीयांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे. मात्र जो वेग आयसीएमआर घेऊ पाहत आहे त्यामुळे जगासमोर भारताचे हसू होऊ नये असे आता या क्षेत्रातील तज्ञांना वाटत आहे. लस खरोखरच मिळणार असेल तर आनंदच आहे , पण कोणाचा तरी मुहूर्त साधण्यासाठी जनतेच्या जिवाशी खेळण्याचा आणि जगासमोर देशाला तोंडघशी पडण्याचा प्रकार होऊ नये , एकदा रामदेव बाबा प्रकरणात हसू झाले, मात्र त्यावेळी कोणत्याही सरकारी संस्थेने ती घोषणा केली नव्हती, आता प्रश्न आयसीएमआरच्या प्रतिष्ठेचाही आहे.  

कशा असतात चाचण्या
कोणत्याही लसीच्या चाचण्या प्रदीर्घ कालावधीसाठी चालतात. लस तयार करताना म्हणजे चाचणी घेताना दुर्मिळ साईड इफेक्ट आणि उशिराने निर्माण होणारे साईड इफेक्ट याचा विचार करावा लागतो. साधरणता: लसीची क्लिनिकल चाचणी हजारोंच्या संख्येने रुग्णांवर घेतली जाते. मात्र आपत्कालीन परिस्थितीत ’रॅन्डमाईझ्ड कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल’ घ्यायच्या म्हटले तरी त्यासाठी देखील काही महिने लागतात . एकदा प्राण्यांवरच्या चाचण्या संपल्या आणि क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाल्यानंतर 2 टप्प्यात या चाचण्या होतात.
पहिल्या टप्प्यात मोजक्याच लोकांना लस आणि नियंत्रित लस 4: 1 प्रमाणात 2 डोस दिले जातात. त्याचा 14 दिवस परिणाम , प्रतिकूल परिणाम याचा  अभ्यास केला जातो. डोस दिल्यानंतरचे 2 तास, 7 दिवस , 14 दिवस लक्षणे पहिले जातात. त्यानंतर त्याच्यात अँटीबॉडी किती तयार होतात ( वैद्यकीय भाषेत इम्युनोजेनिसिटी) तपासली जाते. आणि लस दिल्याच्या 28 दिवसांनंतर त्याचे अहवाल विचारात घेऊन दुसर्‍या टप्प्याला परवानगी दिली जाते . दुसर्‍या टप्प्यात विविध वयोगटाच्या व्यक्तींना मोठ्याप्रमाणात हि लस दिली जाते आणि 14, 28, 104 आणि 196 व्या दिवशी लस दिलेल्या, आणि त्यासोबतच हा लस न दिलेल्या व्यक्तींची लक्षणे अभ्यासली जातात आणि त्यानंतर सदर लस प्रभावी आहे किंवा नाही हे ठरवले जाते.

आयसीएमआरच्या लसीची काय आहे परिस्थिती?
आता आयसीएमआर ज्या लसीच्या संदर्भाने बोलत आहे तिची माहिती घेऊ. भारत बायोटेक या हैद्राबादच्या कंपनीने आयसीएमआर आणि एनआयव्ही या संस्थांच्या मदतीने सदर लस विकसित केली आहे. लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरातून कोरोना विषाणूचा स्ट्रेन घेऊन ही लस बनवण्यात आली आहे. सदर कंपनीला सदर स्ट्रेन मिळाला तो 9 मे  ला आणि कंपनीने आपल्याला क्लिनिकल ट्रायल ला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले ते 29 जून ला , म्हणजे अवघ्या 50 दिवसात लस तयार होऊन त्याच्या प्राण्यांवरच्या चाचण्या झाल्या, त्याचे अहवाल आले आणि औषध नियामकांनी त्याला मंजुरी देखील दिली. कोरोनासारख्या जगातल्या बहुतांश भागात धुमाकूळ घातलेल्या नवीन विषाणूच्या बाबतीत हा वेग आहे. आता 7 जुलै पासून मानवी चाचण्या सुरु होतील, पण त्या अवघ्या महिनाभरात संपवायच्या आहेत. बरे त्यासाठी ज्या 12 संस्था आयसीएमआरने निवडल्या आहेत, त्यातील काही तर साधे नर्सींग होम आहेत, मग इतक्या कमी दिवसात, कमी लोकांवर चाचण्या करून लसीची प्रभाव क्षमता कशी कळणार हा तज्ञांचा प्रश्न आहे.

‘मुहूर्त ’ आहे तरी काय ?
आयसीएमआरला 15 ऑगस्टचा मुहूर्त साधायचा आहे. हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि या दिवशी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करत असतात . मागीलस्वातंत्र्य दिनाला पंतप्रधानांनी ‘स्पेसफ्लाईट’ ची घोषणा केली होती , विशेष म्हणजे त्यावेळी ‘इसरो’ या, या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेने याची कुठलीही तयारी केली नव्हती. आता जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना आयसीएमआरला पुढे करून असाच ‘मुहूर्त’ साधायचा आहे का ? असा प्रश्न आहे. डॉ.भार्गव यांच्या पत्रातील ‘या प्रकल्पाकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष दिले जात आहे’ हा संदर्भ लक्षात घेतला तर ही शक्यता जास्त वाटते.

Advertisement

Advertisement