बीड दि.२६ (प्रतिनिधी) : पाटोदा तालुक्यातील सौताडा येथिल एक तरुण कंबरेला गावठी पिस्तूल लाऊन फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर कारवाई करत ताब्यात घेत पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार मंगळवार (दि.२५) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विशाल मरकस मस्के रा. सौताडा हा गावातील एका हॉटेलसमोर कंबरेला गावठी पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या कोणाची तरी वाट पाहत उभा आहे. माहितीची खात्री करून तातडीने पथक रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठिकाणी पोहोचताच सापळा रचून विशाल मस्के याला अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेताना पॅन्टच्या आत कंबरेला लपवलेली गावठी पिस्तूल आढळून आली. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून आरोपीवर पोलिस ठाणे पाटोदा येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, प्रभारी अधिकारी शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पो.ह. बाळू सानप, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, विकी सुरवसे,चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी केली.

