ज्या पक्षाचा राजकीय गटच मुळात पक्षीय फाटाफुटीतून आणि अभद्र युत्या करून झाला त्या पक्षाच्या नेत्यांना आता मित्र पक्षांनी आपले कार्यकर्ते फोडल्याबद्दल जर चीड येत असेल तर हा शुध्द दांभिकपणा आहे. गुवाहाटीला आणि आणखी कोठे कोठे जाऊन ज्यांनी शिवसेना फोडून भाजपसोबत संसार थाटला ते आता भाजप आमचे नेते पळवतो म्हणून गळे काढणार असतील तर त्यांचे रडणे अरण्यरूदन या पलिकडे वेगळे काही ठरणार नाही. राजकारणात काटे पेरल्यानंतर फुले उगवत नसतात.
राज्यातच नव्हे तर देशभरात भाजप सातत्याने वाढत आहे तो केवळ विरोधकांचा घास घेवून नव्हे तर त्यात मित्र पक्षातील अनेकांच्या समिधा देखील पडलेल्या आहेतच. देशातले कोणतेही राज्य घ्या त्या ठिकाणी भाजपची वाढ ही मित्रपक्षांचा बळी देऊनच झालेली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याची जाणीव नाही असेही म्हणता येणार नाही. मुळात ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचे नाव लागले तेच पक्ष फोडण्याच्या राजकारणातून उध्दव ठाकरेंच्या हातून भाजपच्या मदतीने शिवसेना पक्ष हिसकावून घेताना आज भाजपच्या नावाने गळे काढणार्या शहाजी बापूंसारख्या कोणत्याच नेत्या, कार्यकर्त्याला काही वावगे वाटले नव्हते. त्यावेळी भाजप मित्रपक्ष म्हणविणार्यांसोबत दगा करतोय आणि ही कृती हिडीस आहे हा राजकीय सूज्ञपणा दाखविण्याइतकी संवेदनशीलता कोणत्याच नेत्यात नव्हती. किंबहुना पक्ष फोडीला तात्वीक मुलामा देत ही सारी कृती ‘धर्मवीर’तेची कशी आहे हे सांगण्यासाठी सारे झटत होते. ज्या भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचा घास सहज घेतला आणि वेगवेगळ्या यंत्रणा वापरून तो पचवला देखील त्या भाजपसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान ते काय असणार होते? मात्र याचा राजकीय विचार करण्याची आवश्यकता सत्तेच्या मोहापायी त्यावेळी कोणाला वाटली नाही.
आता मात्र स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जी पक्षांतराची लाट निर्माण झालेली आहे त्या लाटेचे तडाखे एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांनाही बसत आहेत. त्यातल्या त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना राजकीय परिस्थिती जरा लवकर कळते आणि ते उगाच ‘भाजपने आम्हाला असे केले’ असले रडगाणे गात बसत नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेकडे तो राजकीय शहाणपणा देखील नाही त्यामुळे जिथे पक्षाचे नेतेच अधूनमधून ‘रूसू बाई रूसू, आणि गावाकडे जाऊन बसू’ असे करत असतात तिथे शहाजी बापूंसारख्या नेत्यांनी गळे काढल्यास त्यात कसलेच आश्चर्य नाही पण हे सर्व करताना फोडाफोडीच्या राजकारणाला बळ कोणी दिले याचा विचार सर्वांनीच करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात पक्ष फोडण्याचे काटे पेरण्यात आज गळे काढणारांचाही हात आहेच. मग ज्या हातांनी काटे पेरले त्यांना सराटेच वेचावे लागणार, तेथे फुले कशी मिळणार.

