बीड दि. १६ (प्रतिनिधी ) : राजकारणात परिस्थिती एकसारखी कधीच नसते , त्यातील चढ उताराचा अंदाज घेत पाय रोवून उभे राहत निर्णय घेत घेत गेले, तर परिस्थिती बदलता येते याचा अनुभव सध्या बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते घेऊ शकतात . मागच्या काही काळात मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात सुरु केलेले बेरजेचे राजकारण आणि त्यातून दुरावलेल्या जुन्यांना पुन्हा जवळ घेत, त्यांना नव्यांची जोड देण्याची पंकजा मुंडेंची खेळी भाजपला नव्याने ऊर्जा देणारी ठरत आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे राजकारणात सक्रिय असताना बीड जिल्हा साहजिकच भाजपचा बालेकिल्ला बनला होता. यात पक्षाची स्वतःची संघटनात्मक शक्ती किती, हा भाग बाजूला सोडला तरी 'इलेक्टीव्ह मेरिट ' हेरून त्यांना आपल्यासोबत घेत, किंवा आपल्या शक्तीने एखाद्याला 'गुलाल ' लावत गोपीनाथ मुंडेंनी बेरजेचे राजकारण करत जिल्ह्यात भाजपचा राजकीय प्रभाव निर्माण केला होता. पक्ष कोणतेही असतील, पण बीड जिल्ह्याच्या मर्यादेत लढत व्हायची ती गोपीनाथ मुंडेंची माणसे आणि शरद पवारांची माणसे अशीच. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्ह्यातील भाजपची सूत्रे आली, मात्र काही काळ सोडता त्यांनाही पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागले. अगदी जवळची म्हणवणारी माणसे दुरावली, एकाचवेळी पक्षातील आणि बाहेरील विरोधकांशी त्यांचा संघर्ष सुरु राहिला, त्यामुळे असेल किंवा पंकजा मुंडेंच्या राजकारणाबद्दलच्या स्वतःच्या अशा काही ठाम तात्विक भूमिका असतील त्यामुळे,पण मधल्या काळात जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांच्या पातळीवर क्षीण होत चालल्याचे चित्र होते.
मागच्या काही काळात, विशेषतः लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवून, त्या पुन्हा ममंत्री झाल्या आणि ज्या शासकीय बंगल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य होते, त्याच 'रामटेक'मध्ये पंकजा मुंडेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतरच पंकजा मुंडेंनी राजकारणाची दिशा बदलली, आपल्याला काय वाटते याच्यापलीकडे जाऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे पाहत त्यांनी मागच्या काळात जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरु केले. काही कारणांनी दुरावलेल्या पवारांसारख्यांना त्यांनी पुन्हा जवळ घेत विश्वास दिला, बदामराव पंडितांना पक्षात घेतले, धारूरमध्ये निर्मळ पक्षात घेतले, बीडमध्ये त्यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा प्रवेश घडवून आणला आहे. माजलगाव नगरपालिकेत 'मी ठामपणे तुमच्यासोबत आहे ' असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मधल्या काळात जिल्ह्यात फारशा नसणाऱ्या पंकजा मुंडे आता जिल्ह्यात लक्ष घालून ठिकठिकाणी बैठक घेत आहेत, मुंबईत कार्यकर्त्यांचा संपर्क वाढत आहे, अंबाजोगाईत त्यांचे संपर्क कार्यालय झाले आहे. राजकारणात विपरीत परिस्थिती असतानाही बेरजेचे राजकारण आणि सामाजिक सलोख्याची भाषा करत संवादाची तयारी ठेवणारे पंकजा मुंडेंचे राजकारण जिल्ह्यात भाजपला ऊर्जा देणारे ठरत आहे.

प्रजापत्र | Monday, 17/11/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
