Advertisement

आमदार तानाजी सावंतांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रजापत्र | Thursday, 13/11/2025
बातमी शेअर करा

वाशी दि.१३ (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाला मागील सहा महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः धुऊन काढले आहे! शेतीत झालेले अतोनात नुकसान आणि सरकारी मदतीची रखडलेली वाट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याच शेतकरी बांधवांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी शिवसेनेचे भुम-परंडा-वाशीचे विकासरत्न आमदार तानाजीराव सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन सादर केले.

​"शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तातडीने मिळालीच पाहिजे. ती देण्यासाठी कोणत्याही लाल फितीच्या अडथळ्यांचा बोजा सहन केला जाणार नाही!"रखडलेल्या अनुदानावर आमदार सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले की, अनेक शेतकऱ्यांचे अनुदान हे केवळ 'फार्मर आयडी' (Farmer ID) च्या किचकट प्रक्रियेमुळे तहसीलदार व तलाठी स्तरावर प्रलंबित आहे. ही सरकारी दिरंगाई शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखी आहे.तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देऊन 'फार्मर आयडी' ची अडचण लवकरात लवकर दूर करा.कोणताही बहाणा न करता शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करा. तसेच वारसाचे आणि समाईक खातेदारांचे  अनुदानही त्वरित द्या अशा मागण्या निवेदनद्वारे करण्यात आल्या आहेत.
या आपत्कालीन स्थितीत एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये!शिवसेनेच्या स्टाईलने तानाजीराव सावंत यांनी जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला असून, आता जिल्हाधिकारी कार्यालय यावर किती जलदगतीने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बळीराजाला न्याय मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असा इशाराच जणू या निवेदनातून देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement