Advertisement

तुम्ही आपसात भांडत रहा, आम्ही 'पवार' मात्र एकच

प्रजापत्र | Friday, 07/11/2025
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी) : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असलेल्या पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप होताच त्यांच्या पाठराखणीला धावल्या त्या त्यांच्या आत्या, राष्ट्रवादी (शप) च्या सुप्रिया सुळे. राजकारणात 'सुसंस्कृत'पणा असावा तो असा. नाहीतर महाराष्ट्रभरात मागच्या काळात कितीतरी राजकीय घराण्यांची शकले पडली आणि ते घरातलेच वेगळे झालेले गट आता आपसात टोकाचे भांडत असतात. राज्यातील अनेक राजकीय घराण्यांमध्ये दुफळी निर्माण करण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असलेले 'पवार' स्वतः मात्र कोणत्याही राजकीय पक्षात असले तरी एकच असतात, हे आपसात भांडणाऱ्या 'पवार बाधीतांनी' लक्षात घ्यायला हवे. 

राजकारण आणि कुटुंब वेगळे असायलाच हवे, पण कुटुंबातल्या कुटूंबातच 'राजकारण' करण्याची सवय जी महाराष्ट्राला लागली म्हणा किंवा लावली, त्याचे श्रेय मात्र नि:संशयपणे 'पवार' कुटूंबालाच द्यावे लागते. समाजकारणात मोठी उंची असलेल्या शरद पवारांनी राज्याच्या अनेक भागात कुटूंबा कुटूंबातच राजकीय अस्मीतांची वात चेतवून देत राजकारणासाठी कुटूंब वेगळे करण्याची खेळी कायम खेळली. याला रोजच्या बोलीभाषेत घरफोडणे म्हणतात.   पवारांच्या ' घरफोडी'चा प्रसाद मिळालेल्या अशा 'पवार बाधीत' कुटूंबाची यादीच करायची म्हटली तर खूप मोठी होईल. एकटया बीड जिल्ह्यात देखील क्षीरसागर, मुंडे, पंडीत अशा मोठ्या राजकीय घराण्यांमध्ये जी फुट पडली त्यात कर्ते करविते कोण होते हे राज्याला माहित आहे. बीड जिल्ह्यात सोळंके कुटूंबातही असे काही घडविण्याच्या हालचाली झाल्या होत्याच. बीडच नव्हे तर राज्यात मोहीते पाटील काय किंवा निंबाळकर काय, पवार बाधीतांची ही यादी फार मोठी आहे. आज राजकारणापायी वेगळे झालेल्या यातील अनेकांमधून आडवा विस्तव देखील जात नाही. टोकाचा द्वेष, भांडणे हे सारे यांच्यात सुरु असते आणि पुन्हा यातील कोणी ना कोणी वळचणीला असतो तो पवारांच्याच. आता तर एक जण थोरल्या पवारांकडे तर दुसरा धाकल्या म्हणजे अजित पवारांकडे राहून 'स्वकियां'शीच भांडत असतात. 
मात्र राज्याला भांडायला लावणारे म्हणा किंवा भांडणे निवांत पाहणारे म्हणा, 'पवार' मात्र कुटुंब म्हणून एकच असतात. पहाटेच्या शपथविधी साठी थोरले पवार राग राग करतात तो धनंजय मुंडेंचा, मात्र अजित पवारांना दिले जाते उपमुख्यमंत्री पद. तिकडे अजित पवार रोहित पवारांना ' बेटया, मी लक्ष दिले नसते तर तू निवडून आला असतास का' असे जाहिरपणे सांगतात, सुप्रीया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांच्या विरोधात लढतात, मात्र आज दोघीही खासदार, आता पार्थ पवारांवर आरोप काय झाले, आत्याबाई सुप्रीया सुळे तातडीने पाठराखणीला धावल्या. आता पवारांचा 'एकीचा' धडा राज्यभरातील 'पवार बाधीत' कधी गिरवणार?

Advertisement

Advertisement