बीड दि.२६ (प्रतिनिधी): संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात फेरबदल केल्यानंतर कायद्याच्या राज्याचे सरकारने दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. एसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरचौकात सायंकाळी 8 च्या सुमारास एका 22 वर्षीय युवकाचा चाकुने वार करून खून झाल्याची घटना गुरूवारी घडली. मागच्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यात पडलेला हा 10 वा मुडदा आहे. बीडची पोलीस यंत्रणा नेमके काय करतेय आणि यंत्रणेचा वचक नेमका कोणावर आहे? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेच्या आयचा घो! म्हणण्याची वेळ सामान्य बीडकरांवर आली आहे.
दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याची ओळख बिहार किंवा त्या राज्यापेक्षा अधिक खालच्या थराला जाणारी निर्माण केली गेली. बीड कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेतच असते. यात गुन्हेगारीचा मुद्दा केंद्रस्थानी असतांना त्यात आणखी नव्याने भर पडली आहे. बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका (वय 22) या तरुणाचा पोटात चाकु खुपसून खून करण्यात आला. विशेष म्हणजे एसपी ऑफीसपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यश हा पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता. दरम्यान बीड जिल्ह्यात पालकमंत्री मुक्कामी आलेले होते. उद्धव ठाकरेंनी बीडमध्ये भेट दिली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही गुरूवारी बीडच्या दौर्यावर होते. एवढे दिग्गज नेते बीड जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना आणि पोलीसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतरही एसपी ऑफीसपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडल्याने जिल्ह्यात ‘कायद्याच्या आयचा घो!’ म्हणावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या दोन महिन्याच्या आत 10 जणांचे खून करण्यात आल्यामुळे एसपींच्या कर्तव्यकठोर भुमिकेबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री उशिरा यश ढाकाच्या मारेकरी असलेल्या सुरज अप्पासाहेब काटे (वय 21) याला पोलिसांनी अटक केली होती.
कायदा सुव्यवस्थेवर कुणी बोलणार का?
मस्साजोगचे सरपंच असलेले दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मस्साजोगला भेट देवून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केले होते. एवढेच नव्हे तर खूद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये बीड जिल्ह्यात अराजक परिस्थिती असल्याचे जाहीरपणाने कबूलीही दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात नवनीत काँवत यांची एन्ट्री झाली. सरासरी मागच्या 9 महिन्यांपैकी 6 महिन्यात त्यांचे काम जिल्ह्यातील जनतेसाठी समाधानकारक राहिले. अगदी गेल्या दोन महिन्यांबाबत बोलायचे झाले तर जिल्ह्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा प्रश्न कोणालाही पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन महिन्यात दहाजणांचे खून झाले असून यावर एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही. ही जिल्ह्यासाठी शरमेची बाब म्हणावी लागेल.
टग्यांचे मनोधैर्य वाढलेलेच
बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करा असे प्रत्येक दौर्यात पालकमंत्री अजित पवार सांगत असतात. कोणत्याही दबावात येवून काम करू नका सगळ्यांना सरळ करा असे देखील डोस अजित पवारांनी सातत्याने दिले आहेत. मात्र येथील अधिकारी आणि एकूणच प्रशासन अजित पवार आले की त्यांच्या मागे पुढे करण्यातच व्यस्त असते आणि आपली पाठ वळल्यावर जिल्ह्यात काय होते याची माहिती घेण्याची गरज अजित पवारांनाही वाटत नाही. त्यामुळेच बीड जिल्ह्यात टग्यांचे मनोधैर्य वाढतच आहे. याच टगेगिरीतून गुन्हेगारीचे प्रकार होत असल्याचे चित्र आहे.