किल्लेधारुर दि.२२ (प्रतिनिधी):धारुर घाटात दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीस अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
धारूर घाटात अपघाताची मालिका सुरुच असून आज टेम्पो व दुचाकीच्या अपघाताची घटना घडली. आज सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथून माजलगावकडे जाणारा टेम्पो व मुंगी ता.धारुर येथील दुचाकीस्वार धारूरकडे येत असताना घाटात समोरासमोर धडक झाली. या धडकेत मुंजाभाऊ धर्मराज सोळुंके रा.मुंगी, ता.धारुर यांचा जागीच मृत्यु झाला तर याच दुचाकीवरील रमेश मोरे हे जखमी झाले. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान अपघातामुळे धारुर घाट रुंदीकरण प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून नव्याने होणारा मार्ग कसा व कुठून होणार यावर चर्चा रंगत आहेत.