Advertisement

कर्तव्यदक्ष आणि असलीच काहीशी बिरुदे मिरविणारे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई रोखायला सांगणारी 'अरे तुरे 'मधली ऑडिओक्लिप सध्या जोरात व्हायरल होत आहे . हे तेच अजित पवार आहेत, ज्यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून मागच्या प्रत्येक बीड दौऱ्यात अधिकाऱ्यांना 'कोणाचही ऐकायचं नाही, कोणाच्याच दबावात यायचं नाही, कायद्यानुसार काय असेल ते करायचं ' असे सांगून प्रचंड टाळ्या मिळविल्या आहेत आणि आता त्यामुळेच  बीड जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही सुरु आहे. मग तेच अजित पवार सोलापुरात एका महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावत अवैध गौणखनिजावरची कारवाई थांबवायला सांगतात या दुटप्पीपणाला म्हणायचे तरी काय ?

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार पुण्यासोबतच बीडचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे बीड जिल्ह्यात दौरे होत असतात . अजित पवारांसारखा 'खमक्या ' नेता पालकमंत्री म्हटल्यावर प्रशासनाला सुरुवातीला जरा अवघडल्यासारखे वाटले होते . एकतर बीड जिल्ह्यात बहुतेकांची राजकीय तोंडे वेगळ्या दिशेला, त्यामुळे एखाद्या कामात निर्णय घेताना प्रशासनातील अधिकाऱ्यांची कोंडी होणे तसे साहजिकच. मात्र या सर्व अधिकाऱ्यांना अजित पवारांनी मोठा दिलासा दिला. बीडमधल्या प्रत्येक दौऱ्यात, जाहीर कार्यक्रमात अजित पवार अधिकाऱ्यांना 'कोणाचही ऐकायचं नाही, नियमात असेल ते करायचं , कोणाच्याही दबावात यायचं नाही , कोणी काहीही म्हणलं तरी जे कायद्यात तेच करायचं ' असे वारंवार सांगत गेले . अजित पवारांच्या या वाक्यांना टाळ्या आणि शिट्ट्या देखील भरपूर मिळाल्या . जनता बिचारी भाबडी असते , हे जे बोलले जाते ते खरेच असते असे जनतेला वाटते. अधिकाऱ्यांनाही तसेच वाटत असते, त्यामुळे बीड जिल्ह्यात काही अधिकारी तर 'मी म्हणजेच कायदा ' असेही वागायला लागले.अजित पवारांसारखा पाठीराखा असल्यावर इतर कोणत्या लोकप्रतिनिधीचेही ऐकायची गरजच काय असा 'विवेकी' अर्थ प्रशासन काढणार असेल तर त्यात अधिकाऱ्यांची तरी काय चूक? अजित पवारांना जिल्हा कसा सुतासारखा सरळ करायचाय असे म्हणायला पुन्हा कार्यकर्ते तयारच आहेत. तसे काही खरोखर होणार असेल तर त्याचेही स्वागतच, पण प्रशासनातील अधिकारी कंत्राटांमध्ये देखील 'अमुक याच लोकांनी सहभाग घ्यायचा ' असले काही मनमानी नियम बनवू लागले (नंतर ते कंत्राटच मागे घेतले गेले तो भाग वेगळा ) आणि जे कायद्यात नाही ते देखील करू पाहत आहेत हा अजित पवारांच्या 'कोणाचा दबाव नको'चा परिणाम .
आता त्याच अजित पवारांची एक ऑडिओक्लिप सध्या राज्यात चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यात एक महिला पोलीस अधिकारी अवैध गौण खनिज उपस्यावर कारवाई करताहेत आणि ती रोखण्याचे आदेश कार्यकर्त्याच्या फोनवरून राज्याचे कर्तव्यदक्ष , खमके उपमुख्यमंत्री अजित पवार देताहेत . 'रेड ' चित्रपटाची आठवण व्हावी असा सिन , महिला पोलीस अधिकारी  'मला कसे कळणार तुम्ही उपमुख्यमंत्रीच आहेत का , माझ्या फोनवर तुम्ही फोन करा ' असे सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि त्या अधिकाऱ्याला अजित पवार 'तुमची इतकी डेरिंग वाढली का? तुला मला पाहायचे आहे का ? मी ऍक्शन घेईल , ताबडतोब कारवाई थांबवा आणि तहसीलदारांना जाऊन माझे नाव सांगा ' असे सुनावताना ऐकायला मिळत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे हे कारवाई थांबवा असे सांगणे म्हणजे राजकीय दबाव नसेल तर मग राजकीय दबाव म्हणायचे कशाला असते ? भोळ्याभाबड्या बीडकरांनी टाळ्या नेमक्या कशासाठी वाजविल्या होत्या.
बीड जिल्ह्यात एक भूमिका आणि सोलापूर जिल्ह्यात वेगळीच भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री, सत्तेतल्या एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घेणार असतील तर जनतेने या दुटप्पीपणाला नेमके काय समजायचे ? का कोणाचेच ऐकू नका या वाक्यामागचा गर्भितार्थ 'फक्त माझेच एका ' असा काही असतो का ? आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना कारवाईचे वास्तव देखील समजून सांगायचे नसते का ? आज एआयचा आवाज वापरून काय काय होते, हे प्रसाद लाड यांच्या निधी प्रकरणात समोर आले होतेच, मग थेट माझ्या फोनवर फोन करा असे म्हणण्यात त्या अधिकाऱ्यांचे काय चुकले ? असेही अजित पवार अधिकाऱ्यांना किती दबावमुक्त काम करू देतात याची उत्तरे आणखी एक महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमिशनर ' या पुस्तकात कोणालाही सहज अनुभवयाला मिळू शकतात . या दुटप्पीपणाला नेमके म्हणायचे तरी काय ?

Advertisement

Advertisement