बीड दि.१६ (प्रतिनिधी)-महसूल आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना 'विवेक' बाजूला ठेवून आयुक्तालयाला गृहीत धरत काही बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र बीडच्या जिल्हा प्रशासनाचा विनंती बदल्यांचा अर्धा प्रस्तावच विभागीय आयुक्तांनी फेटाळल्याने आता जिल्हा प्रशासनाची गोची झाली आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या प्रशासकीय बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या. या बदली प्रक्रियेबद्दल कर्मचारी संघटनेने देखील आक्षेप नोंदविले होते.काही ठिकाणी जागा रिक्त नसताना संबंधित कर्मचाऱ्यांची विनंती बदली होईल हे गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या पदावर इतर कर्मचाऱ्यांना बदलीने नियुक्ती दिली होती.हा सारा प्रकार 'विवेक' बाजूला ठेवून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.विनंती बदल्यांना आयुक्तांची परवानगी आवश्यक असते.मात्र जिल्हा प्रशासनाने थेट आयुक्तालयालाच गृहीत धरत आपल्या म्हणण्याप्रमाणे विनंती बदल्या होतीलच असा समज करून घेतला आणि काही कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर इतरांना नियुक्ती दिली.आता यातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विभागीय आयुक्तांनी फेटाळली आहे.
यांच्या जागेवर करण्यात आल्या होत्या नियुक्त्या
सहायक महसूल अधिकारी संवर्गात युवराज नागरगोजे (शिरूरकासार), महादेव खोटे (अंबाजोगाई) यांच्या बदल्या होतील असे गृहीत धरून 'प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर' असे म्हणत त्यांच्या जगावे इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.आता या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांना आयुक्तांनी खो घेतला आहे,त्यामुळे इतरही अनेक बदल्या प्रभावित होणार आहेत.
या बदल्यांना मंजुरी
विभागीय आयुक्तांनी केवळ जयसिंग गात (सहायक महसूल अधिकारी अंबाजोगाई येथून बीड),सोनाली कदम (मंडळ अधिकारी ,आष्टी येथून मंडळ अधिकारी मांजरसूंबा ),सुरेश नाकाडे (ग्राम महसूल अधिकारी ता. आष्टी येथून महार टाकळी ता. गेवराई ) या तीनच बदल्यांना मंजुरी दिली आहे.