Advertisement

एकाच दिवशी तीस  लाख वृक्ष लागवड करून बीड जिल्हा नोंदविणार विक्रम, त्यात ७ लाख 'वृक्ष  ' तुतीचे! 

प्रजापत्र | Tuesday, 05/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि. ४ (प्रतिनिधी ) : वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत असलेला बीड (Beed)जिल्हा आता 'हरित महाराष्ट्र अभियानात'? (Green Maharastra) एक विक्रम करू पाहत आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत 'हरित बीड ' ही संकल्पना घेऊन एकाच दिवशी तीस  लाख वृक्ष (Thirty lakh Tree plantation)लागवड करण्याचा संकल्प बीडचे जिल्हाधिकारी (Beed Collector) विवेक जॉन्सन यांनी जाहीर केला आहे. बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(DCM Ajit Pawar) यांच्या हस्ते या लागवडीचा शुभारंभ करायचा आणि एकाच दिवशी तीस लाख झाडे लावत देशपातळीवरचा विक्रम नोंदवायचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. आणि हे तीस लाखाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तब्बल ७ लाख तुतीचे  'वृक्ष' लावले जाणार आहेत.

बीड जिल्ह्यात सध्या हरित महाराष्ट्र अभियानाच्या धर्तीवर 'हरित बीड ' मोहीमसाठी बीडचे प्रशासन सरसावले आहे. या मोहिमेतून बीड जिल्ह्यात वर्षभरात १ कोटी वृक्ष  लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यातील तीस लाख वृक्ष एकाच दिवशी लावायचे आणि त्या माध्यमातून देशपातळीवरचा विक्रम नोंदवायचा, या विक्रमाची नोंद 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स'(Indian book of records) मध्ये व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त करत मागच्या दोन महिन्यांपासून बीडचे जिल्हा प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. या मोहिमेची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून अजित पवार बीडच्या खंडेश्वरी मंदिर परिसरातील मैदानात वृक्ष लागवड करणार आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवडीचे अवघड आव्हान पेलण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या तुती (Mulbery) लागवड (रेशीम विकास ) योजनेतून एकाच दिवशी जिल्ह्यात तुटीचे तब्बल ७ लाख 'वृक्ष '(Mulbery trees) लागवण्याचा 'विवेकी ' विचार देखील जिल्हा प्रशासन राबविणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

 

सर्वच यंत्रणांचा असणार सहभाग
या तीस लाख वृक्ष लागवड मोहीमसाठी महसूल विभासोबतच जिल्हापरिषद, पोलीस, नगरपालिका, वन  विभाग, सामाजिक वनीकरण , वन्यजीव संरक्षण विभाग ,एनजीओ, कृषी विभाग, इको बटालियन आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

 

रेकॉर्ड साठी जय्यत तयारी
या अभियानाची नोंद देशपातळीवरील विक्रम म्हणून व्हावी असा जिल्हाधिकाऱ्यांचा मनोदय आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कृती 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स ' साठी कशी सोयीची असेल हे लक्षात ठेवून 'सूक्ष्म नियोजन ' केले जात आहे. यासाठी प्रत्येक विभागाला एक क्यूआर कोड दिला जाणार आहे. प्रत्येकाने झाड लावताना तो कोड स्कॅन करायचा आहे. तो कोड स्कॅन होताच जिल्हा स्तरावर असलेल्या डॅश बोर्डवर वृक्ष लागवडीच्या संख्येची नोंद होणार आहे. प्रत्येकाने किती झाडे लावली हे लगेच दिसणार आहे. तीस लाख झाडासाठी कोणी कुठे किती झाडे लावायची याची सर्व माहिती आजच तयार आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.या  नियोजनातून आता बीड जिल्हा एका 'मोठ्या ' विक्रमापासून काही तासच दूर असल्याचे चित्र आहे.

 

Advertisement

Advertisement