Advertisement

जातीच्या पलीकडचे धनंजय मुंडे

प्रजापत्र | Tuesday, 15/07/2025
बातमी शेअर करा

समीर लव्हारे
खरंतर राजकारणात जात, धर्म या बाबी असायला नकोत, पण त्याशिवाय कोणत्याच भागातलं राजकारण होत नाही, हे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचं वास्तव. निवडणुकांमध्ये ज्याचा प्रचार केला जात असला किंवा प्रत्येक नेत्याकडे कोणत्यातरी जातीचा म्हणून पाहिलं जात असलं तरी केवळ कोणत्याही एका जातीवर कोणालाच, अगदी कोणालाच राजकारण करता येत नसतं हे देखील वास्तव आहे. त्यामुळेच ज्यांना दीर्घकाळ राजकारण करायचं आहे, ते कोणत्याही एका जातीच्या मर्यादेत अडकत नसतात, माजी मंत्री आणि आ. धनंजय मुंडेंनी आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासात ते दाखवून दिले आहे.

आ. धनंजय मुंडे, आज हे नाव घेतलं की त्यांच्यावर एका जातीचा शिक्का मारला जातो. मात्र धनंजय मुंडेंच्या एकूणच राजकीय प्रवासावर नजर टाकली आणि त्यांच्यासोबत जे लोक राजकारण, समाजकारणात मोठे होत गेले, त्यांची नाव पाहिली तर धनंजय मुंडेंवर एका जातीचा शिक्का मारणं कितपत योग्य आहे असा प्रश्न कोणालाही पडावा. ज्यांना केवळ एखाद राजकीय नेतृत्व संपवायचंच आहे, किंवा केवळ ट्रोलच करायचं आहे त्यांनी असा काही विचार करावा असं अपेक्षित देखील नाही. मात्र आज हे जे एका नेत्यासाठी असत, ते उद्या इतरांच्याही वाट्याला येणारच असत. बीड जिल्ह्याचीच काय, राज्यातल्या काही अपवाद वगळता बहुतांश मतदारसंघांची रचनाच अशी आहे, की सर्वांना सोबत घेतल्याशिवाय कोणालाच राजकारण करता येणार नाही. अगदी शरद पवार, देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणी, त्यांनाही ते शक्य नाही. मग धनंजय मुंडे तरी त्याला अपवाद कसे असतील?
एकूणच धनंजय मुंडे राजकारणात आले आणि वाढले ते दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे बोट धरून. बीड जिल्ह्यातील मराठा समाजामधील राजकीय प्रवाहापासून बाजूला जात असलेल्या अनेकांना राजकारणात पुन्हा बळ देण्याचं श्रेय गोपीनाथ मुंडेंना द्यावंच लागेल. तोच राजकीय विचार धनंजय मुंडेंनी उचलला असेल तर त्यात आश्चर्य कसले? बरे आज धनंजय मुंडेंवर जातीचा शिक्का मारताना, ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला तरी कोणाचंच केवळ एका जातीचं असणं पचणार आहे का तर तसंही  नाही. त्यामुळे असेल, किंवा बीड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय परिस्थितून आल्यामुळे, राजकारणाची सुरुवात अगदी जिल्हापरिषदेच्या राजकारणापासून झाल्याने असेल, धनंजय मुंडे कायम सर्वच जाती, धर्मांना सोबत घेऊन प्रवास करत आले आहेत.
नारायण शिंदेंसारखा कार्यकर्ता धनंजय मुंडेंचा अगदी  'अरे कारे' च्या भाषेत बोलणारा मित्र असतो, कल्याण आखाडे सारख्या व्यक्तीची मैत्री  पक्षाच्या भिंतीच्या बाहेर जाऊन देखील धनंजय मुंडे निभावतात, राजेश्वर चव्हाण असतील किंवा आणखी कोणी, परळी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये स्थानिक निवडणुका, बाजार समित्या,  सेवा संस्था आदींमध्ये प्रतिनिधित्व देताना धनंजय मुंडेंनी निवडलेले चेहरे त्यांच्या सामाजिक व्यापकतेची प्रचिती देत असतात. पद द्यायचे असेल तर कधी दीपक देशमुख, कधी बाजीराव धर्माधिकारी हे धनंजय मुंडेंचे हक्काचे चेहरे असतात.बीडमध्ये अविनाश नाईकवाडे, अमर नाईकवाडे, फारुख पटेल यांच्यासारखे चेहरे पुढे आणण्याचे काम मुंडेंनी केले. माजलगावमधील बाबुराव पोटभरेंसारख्या नेत्याला धनंजय मुंडेंशी बोलताना कधी अवघडलेपण जाणवत नाही. उदाहरणेच द्यायची तर अशी यादी फार मोठी होईल. खरेतर अशी जातीय संदर्भ असलेली उदाहरणे देण्याची वेळ यावी हे एकूणच सामाजिक मानसिकता कुपोषित होत असल्याचेच लक्षण, मात्र याच मानसिकतेतून एखादे नेतृत्वच बाजूला फेकले जाणार असेल तर अशा साऱ्या उदाहरणांची आवश्यकता असतेच असते. कारण नेतृत्व, मग ते कोणतेही असो, सहज घडत नसते. धनंजय मुंडेंना हे माहित आहे, आणि म्हणूनच समाज माध्यमांवर कोणी कितीही ट्रोल केले, तरी त्यांच्या भोवती जमणारे चेहरे जातीय चष्म्याच्या पलीकडचे असतात हे ढळढळीत वास्तव आहे.

Advertisement

Advertisement