बीड दि.२९ (प्रतिनिधी)-राज्यभरातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणाऱ्या 'उमाकिरण' शैक्षणिक संकुलातील बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात अखेर बीड पोलिसांना यश मिळाले आहे.घटना घडल्याबरोबर गायब झालेले आरोपी पोलिसांनी मोठ्या 'परिश्रमाने' बीडपासून अवघ्या ४० किलोमीटरच्या परिसरातच २४-२५ तासात पकडले. २४ तास उलटल्यानंतरही आरोपी बीडच्या भोवतीच फिरत होते याला पोलिसांचे 'चातुर्य' म्हणायचे का आरोपींची 'मजबुरी' याच्या चर्चा आता सुरु आहेत.त्यातही या कारवाईसाठी आजारी रजेवर असलेल्या एका अधिकाऱ्याने 'कर्तव्या' च्या हाकेला स्वतःच्या प्रकृतीपेक्षा अधिकचे महत्व दिल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीडच्या 'उमाकिरण' शैक्षणिक संकुलातील एका क्लासेसमध्ये झालेल्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली होती. बाललैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय पवार आणि प्रशांत खाटोकर गायब झाले होते.त्यांच्या अटकेसाठी बीडमध्ये मोठ्याप्रमाणावर दबाव वाढत होता.अटकेची मागणी करत नागरिकांनी बीड जिल्हा बंदची हाक देखील दिली होती.पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी अनेक पथके देखील रवाना केली होती.कदाचित पोलिसांची हीच धावाधाव आणि बीड जिल्ह्यातील वाढत जनआक्रोश पाहून आरोपी बीड शहरच्या जवळपासच फिरत राहिले का काय असे वाटावे असेच चित्र समोर आले आहे.या दोन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्याच्या २५-२६ तासानंतर पोलिसांनी मोठ्या 'परिश्रमाने' बीड पासून ३०-४० किलोमीटरच्या परिसरातून अटक केली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींना जेथून अटक दाखविली ती ठिकाणे देखील जवळच आहेत.हे दोन्ही आरोपी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवास करीत होते हा आणखी एक योगायोग.
विशेष म्हणजे पोलिसांमधील कर्तव्यतत्परता काय असते याचे देखील दर्शन या प्रकरणातून झाले.मध्यंतरी अचानक सिकमध्ये गेल्याचा ठपका ठेवत एक पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते,त्यामुळेही असेल कदाचित,पण आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकातील एका अधिकाऱ्याने स्वतः सिकमध्ये असताना,आरोग्याची काळजी बाजूला ठेवून कर्तव्य अगोदर म्हणत ही अटकेची कारवाई पार पाडली,याचीही दखल पोलीस अधीक्षकांनी घ्यायला हवी असे बोलले जात आहे.
मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना रविवारच्या पहाटे अटक केल्यानंतर त्यांना रविवारीच बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने आरोपींची चौकशी करून सीसीटीव्ही हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.आरोपींच्या वतीने विधिज्ञ बी.डी.कोल्हे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर बीडच्या न्यायालयाने आरोपींना मंगळवार १ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्हा बंद मागे
उमाकिरण संकुलमधील क्लासेसच्या विद्यार्थीनीची छेड काढून फरार असलेले प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना बीड पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून अटक केली. यामुळे पवार, खाटोकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.३०) पुकारण्यात आलेला बीड जिल्हा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश धांडे, राष्ट्रवादीचे युवा नेते शिवराज बांगर, वंिचतचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह सुरज चुंगडे, प्रा.पंडित तुपे, राजेंद्र आमटे, अनुरथ वीर, अॅड.संगिता धसे, अमोल वडतिले,सोमेश कदम यांनी सांगितले. दरम्यान, पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे प्रा.उबाळे,अॅड धांडे यांनी सांगितले.