बीड दि. २३ (प्रतिनिधी ) : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मे महिन्यात झालेल्या गंभीर अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दाखल घेतली आहे. या प्रकरणातील अपघाताची कारणे आणि उपाययोजना यांचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले असून त्यानुसार शासनाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २६ मे रोजी गढी येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला होता.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी येथे असलेल्या उड्डाणपुलावर अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला काढणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या एका वाहनाने चिरडले होते. यात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताने सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर आता या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते अपघात विषयक समितीने स्वतः गंभीर दाखल घेतली आहे. या अपघाताचा संपूर्ण अहवाल ३० जून पर्यंत सादर करण्याचे निर्देश समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. अपघाताची कारणे, असे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना आदी बाबींचा समावेश या अहवालामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावरून आता परिवहन आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन २५ जूनपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे सांगितले आहे. रस्ते सुरक्षा संदर्भातील सर्व विभागांच्या समन्वयाने हा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरटीओंनी उड्डाणपूल ठरविला होता सदोष
सदर अपघात घडल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या बीडच्या अधिकाऱ्यांनी सदर अपघाताबाबत रस्ते सुरक्षा समितीला प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यात गढी येथील उड्डाणपूल तांत्रिक दृष्ट्या चुकीचा असून उड्डाणपुलाच्या मधोमध खोलगट भाग झालेला आहे, तेथे पाणी साचते आणि अपघात होतात असे म्हटले होते. अपघाताचे कारण म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या बांधणीवर ठपका ठेवला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली होती समिती
आरटीओच्या या अहवालसंदर्भाने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना विचारणा केल्यावर त्यांनी या अहवालाच्या संदर्भाने अभ्यास करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग परिवहन, बांधकाम आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली असून त्या समितीचा अहवाल अद्याप आला नसल्याचे मागील आठवड्यात सांगितले होते.